विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

नागपूर, दि. 21 : “विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात येणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अंतिम आठवडा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, विविध नियमांन्वये चर्चा, औचित्याचे मुद्दे इत्यादी संसदीय आयुधे अत्यंत महत्त्वाची असून याद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात दोन्ही सभागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात”, असे माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विधान भवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत अभ्यासवर्ग सुरू आहे. त्यामध्ये आज ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिका हे आपल्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांना आपण चौथा स्तंभ मानतो. कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असते. त्याचबरोबर विधिमंडळात तयार होणारे कायदे हे घटनेला अनुसरून आहेत किंवा नाहीत यावर न्यायपालिकेचे नियंत्रण असते. अशाप्रकारे एकमेकांवर नियंत्रण असणारी आपली राज्यपद्धती आदर्शवत अशी आहे.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेतील सदस्य हे फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतेच प्रश्न न मांडता राज्यातील कोणत्याही भागातील प्रश्न विधिमंडळात मांडू शकतात. सभागृहात राज्यातील सर्व भागांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होते. या प्रश्नांची शासनाला दखल घ्यावी लागते आणि त्यावर कार्यवाही करावी लागते. अधिवेशन काळात शासन यंत्रणेला गती येते, मंत्र्यांनाही राज्याच्या विविध भागांतील अनुषंगिक प्रश्न माहीत होतात. त्यावर चर्चा, वाद-संवाद होत असल्याने सर्वांगीण माहिती घेऊन प्रश्न सोडविले जातात. अशा पद्धतीने लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारी आपली संसदीय पद्धती आहे, असे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधिमंडळात सदस्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध संसदीय आयुधांच्याद्वारे व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाते, त्यातील दोष दूर केले जातात आणि शासन यंत्रणा गतिमान होते. त्यामुळे ही संसदीय आयुधे फार महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर विधिमंडळात विविध समित्या कार्यरत असतात. यामध्ये प्रामुख्याने अंदाज समिती, लोक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांचा समावेश आहे. लोकहिताचा एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर या समित्यांद्वारे कामकाज केले जाते. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने या समित्या फार महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार लहू कानडे यांनी थोरात यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे यांनी केले. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी यशश्री राणे हिने आभार मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 'जैसे चीन...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद पर संजय राउत का बयान..

Wed Dec 21 , 2022
मुंबई. महाराष्ट्र और कर्नाटक के बीच सीमा विवाद सुलझने का नाम ही नहीं ले रहा है. इस मुद्दे को लेकर महाराष्ट्र और कर्नाटक के नेताओं के बीच तीखी बयानबाजी जारी है. संजय राउत ने इसे लेकर एक बयान दे दिया है. उन्होंने कहा है कि ‘जैसे चीन हमारे यहां घुसा है, वैसे ही हम कर्नाटक में घुसेंगे. राउत के बयान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com