मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत

नागपूर, दि. ४ :- हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी 12:45 वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तत्पूर्वी या महामार्गाची पाहणी रस्ते मार्गाने करण्याचे काल त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त भेट दिली. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्हे २६ तालुके ३९२ गावातून हा महामार्ग जात आहे. त्यामुळे नागपूर येथील झिरो पॉईंट या ठिकाणावरून उभय नेत्यांनी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काही मिनिटांसाठी त्यांचे स्वागत करण्यात आले.तर अनेक ठिकाणी खास आग्रहाने त्यांचे लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी स्वागत केले.

सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली होती. विदर्भ, मराठवाडा व विदर्भातील दुर्गम भागांचे मुंबईपासून अंतर कमी करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. एक नवा इकॉनोमिक कॅरीडोर उभारण्याचा हा प्रयत्न प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गाची सुरुवात या प्रदेशातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची व जिव्हाळ्याची घटना ठरत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता विदर्भ मराठवाड्यात असून आज या पाहणी दौऱ्यानिमित्त या रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी,व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता.

विदर्भात ठिकठिकाणी स्वागत

विदर्भात खासदार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसर, यांच्यासह उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, पुरुषोत्तम भुसारी हे पाहणी दौऱ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फुंडकर आमदार संजय रायमुलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री वीसपुते यांनी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत 

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले.  नागपूर विमानतळावर  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन आदींनी त्यांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Sun Dec 4 , 2022
मुंबई :- पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. औरंगाबाद येथील मुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com