संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार व्यवसायाला उधाण आले असून हा जुगार व्यवसाय बिनधास्तपणे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जाते. एकीकडे सी पी अमितेशकुमार येथील कायदा सुव्यस्था नियंत्रणात ठेवण्यासह अवैध व्यवसायिकासह गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांच्याच अधिनस्थ कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे अवैध व्यावसायिकांना पाठबळ देऊन सी पी अमितेशकुमारच्या शिस्तीला गालबोट लावण्याचे बिनधास्त कार्य करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांना उधाण आले असून येथील बिट मार्शल सह संबंधित पोलिसांना मिळत असलेल्या ‘देण’मुळे ‘तेरी भि चूप मेरी भि चूप अशी भूमिका साकारत आहेत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन डीसीपी अविनाशकुमार यांच्या कार्यशैली मुळे वाजलेला दणका इतका होता की यांच्या फक्त नावाच्या भीतीमुळे अवैध व्यवसायिकांनी कामठी बाहेर बस्तान मांडून काही जण भूमिगत झाले होते मात्र आता ती भीती मिटल्यामुळे पोलिसांचा कुठलाही भय न राहल्याने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. एकीकडे दिवाळी सन तोंडावर असताना या जुगार व्यवसायामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होणार आहेत. तेव्हा पोलिसांनी मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे या अवैध व्यावसायिकांना शह न देता नागरी हितार्थ कार्य करून जुगार व्यवसाय बंद करून संसार उध्वस्त होण्यापासून बचाव करून सामाजिक बांधिलकी जोपासून खाकी ची खरी भूमिका साकारावी तसेच अश्या अवैध व्यावसायिकांना शह देणारे बिट मार्शल तसेच भ्रष्ट पोलिसांवर सी पी अमितेशकुमार काय कारवाही करतील याकडे जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे.