मुंबई :-अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर इयत्ता ७ वी नंतर मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील महिलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी भारताने मदत करावी असे आवाहन अफगाणिस्तानच्या इस्लामी गणराज्याचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझाय यांनी आज येथे केले.
राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी बुधवारी (दि. १५) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक, अफगाणिस्तानच्या दूतावासातील व्यापार विभाग प्रमुख कादीर शाह, शिक्षण प्रमुख सेदिकुल्ला शहर व अफगाणिस्तानच्या राजदूतांचे सचिव इद्रीस मामुन्दझाय उपस्थित होते.
देशात तालिबानी राजवट असली तरी आपण तालिबानचे प्रतिनिधी नाही तर अफगाणिस्तानच्या जनतेचे प्रतिनिधी आहोत असे राजदूतांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानचा भारताशी व्यापार अजूनही सुरु आहे मात्र व्यापाराला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे राजदूतांनी सांगितले.
भारत व अफगाणिस्तानचे संबंध फार जुने व विश्वासाचे असून भारत सदैव अफगाणिस्तानच्या पाठीशी राहील असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात, विशेषतः पुणे येथे अनेक अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असून आपण त्यांना भेटलो असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी राजदूत फरीद यांना सांगितले.