– ९ मुलांना बिहारच्या बस्करहुन आणले मजुरीसाठी
– सहा मुले अल्पवयीन
– आर्थिक फायद्यासाठी भावांची शक्कल
नागपूर :- रेल्वेने मानव तस्करी करणार्या आरोपीस आरपीएफच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकाहून पकडले. सखोल चौकशी करून आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या तक्रारीवरून आरोपी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद यादव (२६), संजयकुमार यादव (२७) दोन्ही रा. भोजपुरीया, बिहार अशी त्यांची नावे आहेत. सध्या अल्पवयीन मुलांना बाल निरीक्षन गृहात ठेवण्यात आले आहे.
आरोपी प्रमोद आणि संजयकुमार हे दोघे सख्ख्ये भाऊ आहेत. त्यांनी बक्सरच्या अल्पवयीन मुलांना नागपूरातील एका कंपनीत जुरीसाठी नेण्याचा योजना आखली. संजयकुमारने अल्पवयीन मुलांना आमिष दिले. त्याच्या आमिषाला नउ मुले बळी पडले. यातील तीन मुले १९ ते २४ वर्षाचे तर उर्वरीत ६ मुले १२ ते १७ वयोगटातील आहेत. १० नोव्हेंबरला प्रमोदने सर्व नउ मुलांना रेल्वेने नागपूरात आणले. त्यांना एका कंपनीत कामाला लावले. तीन युवक आनंदाने काम करीत होते. मात्र, सहा मुलांना काम शक्य नव्हते. त्यांचा जीव रडकुंडीस आला. चार दिवसानंतर त्यांनी घरी जाण्याची ईच्छा व्यक्त केली. सर्वांचे एकमत झाल्याने ऑटोरीक्षाने नागपूर रेल्वे स्थानकावर आले.
त्यांचे भेदरलेले चेहरे आणि रडकुंडीस आलेला जीव आरपीएफच्या सीसीटीव्ही केंद्रात कार्यरत जवानांनी टिपला. या घटनेची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनात एएसआय पांडे, विक्रमसिंग ठाकूर, निरजकुमार, दीपा कैथवास, विना सोरेन यांनी घटनास्थळ गाठून मुलांना ताब्यात घेतले. तसेच बळजबरी करणार्या प्रमोदलाही पकडले. ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी प्रमोदला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी दरम्यान अल्पवयीन मुलांना गोळा करणारा प्रमोदचा भाउ संजयला १६ नोव्हेंबर रोजी अटक केली. दोन्ही भावांची कारागृहात रवानगी करण्यात आली.