– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ तेलंगणातील पत्रकारांचा आवाज बनेल : संदीप काळे
हैदराबाद :- ‘तेलंगणा राज्यातील पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी लढणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ हा यापुढे तेलंगणातील पत्रकारांचा आवाज बनेल’, असे प्रतिपादन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
देशभरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे काम जोमाने सुरू आहे. तेलंगणातील पत्रकारांची एकमूठ बांधली गेली असून येथील कामाचा आढावा घेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नुकताच तेलंगणा राज्याचा दौरा केला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे तेलंगणा अध्यक्ष बी. संदेश यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. तेलंगणाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी संदीप काळे यांचा हृद्य सत्कार केला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या तेलंगणा राज्यतर्फे येत्या १५ जून ते २० जून दरम्यान हैदराबाद येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. या संमेलनाच्या तयारीचा आढावा काळे यांनी यावेळी घेतला.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे तेलंगणा प्रदेश उपाध्यक्ष एमडी मोहसिन, प्रदेश कार्यसमिती सदस्य डॉ. पद्माकर, टी. रवींदर, आदिलाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद शफी, संदीप वरवटकर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बी. संदेश यांनी आगामी काळात होत असलेल्या महाअधिवेशनाच्या तयारीची माहिती दिली. बी. संदेश म्हणाले, तेलंगणा राज्यात अडीच हजार पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मध्ये सदस्य होणे पसंद केले आहे. अजून सदस्य होण्याचा ओघ सुरु आहे. तेलंगणा राज्यातील संघटनात्मक बांधणी, आंदोलनात्मक कामाचा लेखाजोखा, दर महिण्याला होणारे उपक्रम, तेलंगणा सरकारकडे पत्रकारांच्या मागणीसाठी प्रलंबित असणारे विषय या बाबतचा अहवाल बी. संदेश यांनी संदीप काळे यांच्याकडे दिला.
महाराष्ट्र पॅटर्न तेलंगणात राबविणार- संदीप काळे
महाअधिवेशन, आणि तेलंगणा राज्याचा आढावा घेतल्यानंतर संदीप काळे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, पत्रकारांचा व त्यांच्या परिवाराचे अनेक गंभीर प्रश्न तेलंगणा राज्यात आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तेलंगणा राज्याची ‘ब्लू प्रिंट’ तयार केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकार आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या झेंड्याखाली एकवटले असून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत, तेच तेलंगणात होणार आहे. देशभरात संघटनेचे काम वेगाने वाढत आहे. हा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ आता तेलंगणा राज्यात राबवण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची संघटनात्मक बांधणी तेलंगणा राज्यात पूर्ण झाली आहे. आता पत्रकार व त्यांच्या कुटुंबांच्या संरक्षण व हक्कासाठी लढायचे आहे. तेलंगणात सर्वच राजकीय पक्षांची मुखपत्रे आहेत. त्यामुळे पत्रकारांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. तेलंगणातील पत्रकारांना एकत्र आणत त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कार्य करणार असल्याचे संदीप काळे यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळ : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे तेलंगणा राज्यात आल्यावर त्यांचा सत्कार करतांना प्रदेशाध्यक्ष बी. संदेश, सोबत तेलंगणा प्रदेश उपाध्यक्ष एमडी मोहसिन, प्रदेश कार्यसमिती सदस्य डॉ. पद्माकर, टी. रवींदर, आदिलाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद शफी, संदीप वरवटकर यावेळी उपस्थित होते.