कामठी गुमथळा मार्गावरील अवजड वाहतूक वळती करावी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देशात रस्त्यांचे अगदी जाळे विणले जात असले तरीही जड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी गावखेड्यातून चोरट्या मार्गाने वाहतूक करत टोल नाके वाचविणे किंवा अवैध माल वाहतूक करणे काही सोडलेले नाही. याचे जिवंत उदाहरण बघायचे असल्यास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी एकदा तरी कामठी गुमथळा मार्गावरून सतत वर्दळ असणाऱ्या व जड वाहतूक करणाऱ्या ट्रककडे लक्ष द्यायला हवे.

गेल्या कित्येक दिवसांपासून स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून या प्रश्नाला उचलून धरले जात असले तरीही यंत्रणा यावर कारवाई करायला तयार नाही, यावरून यंत्रणेचे हात बांधले तर नसावे! अशी शंका जनतेच्या मनात उपस्थित व्हायला वाव उरतो.
कामठी गुमथळा मार्ग सध्या अवैध आणि जड वाहतुकीमुळे इतका गजबजलेला असतो की, केव्हा कुणाचा अपघात होईल, याची शाश्वती नसते. यापूर्वी सुद्धा या मार्गावर आजनी गावातील किमान तीन ते चार व्यक्तींचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. त्यात दोन तरुणींचा समावेश होता. तरीही या मार्गावरून अगदी सुसाट पळणाऱ्या या गाड्यांचा वेग कुणी आवरणार की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.

नाही म्हणायला आजनी रेल्वे क्रॉसिंग जवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू तेवढ्या ठरत आहेत. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ हे ट्रकचालक अगदी मुजोर होऊन आडवे तिडवे ट्रक लावतात. परिणामी अन्य वाहनांना आपली वाहने काढतांना बरीच कसरत करावी लागते. प्रसंगी वाहनांची बरीच मोठी रिघ या क्रॉसिंग जवळ लागल्याने नोकरीवर जाणाऱ्या चाकरमाण्यांची व विद्यार्थ्यांची दमछाक होऊन जाते. गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या कितीतरी वर्षांपासून ग्रामस्थांच्या मनात धडकी भरत असताना आता कितीतरी महिन्यांपासून या मार्गावरून सुसाट पळणारे ट्रक जीवघेणे ठरत असले तरीही, याकडे लक्ष द्यायला ना प्रतिनिधींना वेळ आहे आणि ना पोलीस यंत्रणेला. आता तर हे ट्रक एकतर एखाद्या राजकीय व्यक्तीचे असावे किंवा एखाद्या तस्कराचे असावे,असा कयास ग्रामस्थ लावत असल्याचे चित्र आहे. पुढे सुरू होणाऱ्या शाळा बघता या मार्गावरून कितीतरी विद्यार्थी सायकलने कामठीला ये जा करणार आहेत. या जड वाहतुकीमुळे त्यांच्या जीवाला होणारा धोका लक्षात घेता, या जड वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात यावा, ही अवजड वाहतूक बायपास मार्गाने किंवा महामार्गाने वळती करावी, अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

41 रक्तदात्यानी केले स्वेच्छेने रक्तदान

Wed Jun 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – युवानेते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त कामठी येथे रक्तदान शिबीर संपन्न. कामठी :- युवासेनेचे वतीने युवानेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.कामठी मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात संपन्न झालेल्या या उपक्रमात कामठी येथील नागरिकांनी, युवकांनी, मोठ्या संख्येने उपस्थित होवून या शिबिराचा लाभ घेतला.तर ४२ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com