नागपूर : शहरात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेसाठी सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वर्धा रोडवर एअरपोर्ट साऊथ ते मिहान उड्डाणपूल मार्गापर्यंत नागपूर महानगरपालिकेच्यावतीने रस्त्याच्या दुभाजकावर वृक्षारोपण आणि संरक्षक भिंतींवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात येत आहेत.वर्धा रोडवरील उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन पुढे जाताना एअरपोर्ट साऊथ पासून रस्त्याच्या दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात येत आहे. या दुभाजकावर टर्मिलीया ही साधारणत: 10 फुट उंचीची झाडे आणि सोबतीला युकोडबिया ही छोटी काटेरी व सुंदर लाल रंगाची फुले असलेली रोपटे लावण्यात येत आहेत. यामुळे उन्हाची चाहूल लागली असतांना रस्ता फुला-झाडांनी बहरलेला दिसून येत आहे.
एअरपोर्ट साऊथकडून पुढे जातांना मिहान उड्डाणपूलाजवळ रस्त्याच्या दुभाजकावर सुंदर झाडे लावण्यात येत आहेत. तसेच रस्त्याशेजारील संरक्षक भिंतींवर प्राणी व जैवसंपदा दर्शविण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाला अनुरुप अशी उद्योग क्षेत्रातील विकासात्मक वाटचाल दर्शविणारी चित्रेही येथे रेखाटण्यात आली आहेत.