व्यावसायिक संकुलामुळे महालातील रस्ते मोकळा श्वास घेतील – केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी

– बुधवार बाजारातील व्यावसायिक संकुलाचे भूमिपूजन

नागपूर :- महाल हा वर्दळीचा परिसर आहे. या भागाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे; मात्र रस्ते मोठे करणे खूप आवश्यक होते. या ठिकाणी पार्किंगला जागा उपलब्ध नव्हती. संपूर्ण शहर बदलत असताना महाल भागाचा ही विकास होणे आवश्यक आहे. व्यावसायिक संकूल उभे झाल्यावर महालातील रस्ते मोकळा श्वास घेतील. असे अनेक मार्केट्स नागपुरात सुरू झाले तर शहराच्या रस्त्यावरील गर्दी कमी होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला.

नागपूर महानगर पालिकेच्या वतीने महाल येथील बुधवार बाजारातील व्यावसायिक संकुलाचे भूमिपूजन तसेच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील विविध आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अशोक मानकर, भाजप नेते गिरीश देशमुख, नागपूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुधीर राऊत, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल,प्रशांत उगेमुगे, आर्किटेक्ट मोखा यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या; पण त्यावर मात करून प्रकल्पाचे काम सुरू होत आहे. त्यामुळे हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कुणाचे ही नुकसान न करता हा प्रकल्प उभा होत आहे. चांगले काम झाले पाहिजे, लोकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत, हीच भावना आहे. या प्रकल्पामुळे मनपाला १३६ कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे. गरिबांचे नुकसान होणार नाही.’

नागपूर महानगर पालिकेच्या सभागृहाचा विकास करून पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. गीता मंदिराच्या पुढे १५ लाख चौरस फुटाचे टेक्स्टाईल मार्केट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नागपुरातील सहा मार्केट्स विकसित करण्याचे काम लवकरच सुरू होईल. पण यातील कुठेही दुकानदारांना त्रास दिलेला नाही. याउलट बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी देखील मदत केली जाईल, असेही ना. गडकरी म्हणाले.

*नागपूरकर हे माझे कुटुंब*

पूर्व आणि मध्य नागपूरच्या विकासाला विशेषत्वाने प्राधान्य दिले आहे. पण लोकांच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. नागपूरला मी घराप्रमाणे आणि जनतेला कुटुंबासारखे मानतो. लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आपले शहर देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम शहर व्हावे, असा माझा प्रयत्न आहे, अशी भावना ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

*असे असेल व्यावसायिक संकुल*

सध्या बुधवार बाजार असलेल्या २४५ दुकानांचे नव्या वास्तूमध्ये स्थानांतरण होईल. याठिकाणी काही दुकाने व किरकोळ विक्रेत्यांसाठी ओट्यांची व्यवस्था असेल. तळमजला व दहा मजले अशा या इमारतीत पार्किंगसाठी मोठी जागा असणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजानेही राष्ट्रभक्ती, संस्कृती, संस्काराचा जागर करावा धामणगावच्या नवोत्थानात सरसंघचालकांची अपेक्षा

Sun Feb 25 , 2024
धामणगाव रेल्वे :- समाजामध्ये चांगले भाव, चांगली संस्कृती, उत्तम संस्कार, राष्ट्र भक्ती, योग्य परिवर्तन करण्याचे कार्य केवळ संघाचेच नसून, संपूर्ण समाजाने समोर येऊन हे कार्य करणे अभिप्रेत आहे. तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे, या ध्येयानुसार आपल्याला भारताची व संपूर्ण समाजाची उत्तम निर्मिती करायची आहे. संघाचे नाव इतिहासात नोंदविले गेले नाही तरी चालेल, परंतु संघ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com