इंधन बदलाने कमी होईल प्रदूषण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– ‘राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद’चा समारोप

नागपूर :- पेट्रोल-डिझेलऐवजी बायोइंधन किंवा पर्यायी इंधनाचा वापर केल्याने आपण प्रदूषणावर नक्कीच मात करू शकतो. तंत्रज्ञानाच्या आधारानेही ते शक्य आहे. त्यासाठी खासगी वाहनांसह एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यायी इंधनावर येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदचा आज समारोप झाला. त्यावेळी ना. नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर शालिनी अग्रवाल, पायल कनाके, शिल्पा कुमारी, मयूर झवेरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरणाचे रक्षण केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेचे जगणे सुसह्य होणार नाही, असे सांगतानाच ना. गडकरी यांनी उपस्थित तरुणांना पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले. ना. गडकरी म्हणाले, ‘देशाच्या पुनर्निमाणात तीन गोष्टींचा उल्लेख महत्त्वाचे स्तंभ म्हणून होतो. इथिक्स, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी-पर्यावरण. यात पर्यावरणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण या कार्यक्रमात त्यावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यात नक्कीच विधायक कार्य घडेल असा मला विश्वास आहे.’ वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण या तीन मोठ्या समस्या आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची आणि प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये यासंदर्भात बरेच प्रयत्न झाले आणि काही प्रमाणात यशही आले आहे. वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणावर मात करण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू आहेत. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण जीवाश्म इंधनाचा (फॉसिल फ्युएल) वापर आहे. त्यात पेट्रोलियम इंधनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे नुकसान तर होत आहेच, शिवाय आर्थिक समस्याही निर्माण होत आहेत. आज आपण पेट्रोलियम इंधनाची १६ लाख कोटी रुपयांची आयात करीत आहोत आणि पर्यायी इंधनाचा वापर केला नाही तर पुढील काही वर्षांमध्ये ही आयात २५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी मी २०१४ पासून जगातील सर्व मोठ्या वाहन उद्योग कंपन्यांकडे इलेक्ट्रिकवर किंवा इतर पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांच्या उत्पादनासाठी आग्रह धरत आहे. कारण वाहन उद्योगाने आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार दिला आहे आणि देशाच्या महसुलात सर्वांत मोठी भर देखील वाहन उद्योगातून पडते. वाहन उद्योग आणखी वाढावा, पण प्रदूषण होऊ नये अशी आमची भूमिका आहे. देशाला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.’ इथेनॉल हे शेतकऱ्यांचे इंधन आहे. ५ लाख कोटींपर्यंत या इंधनाने मजल मारली तर देशाचा कृषीदर १२ टक्क्यांवरू २५ टक्क्यांवर जाईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना, आदिवासींना होणार आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शेतकरी अन्नदाता, ऊर्जादाता, बिटुमेनदाता आणि आता हवाई इंधनदाता म्हणून ओळखला जात आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्र मजबूत करण्यास फायदा होईल, असेही ते म्हणाले.

NewsToday24x7

Next Post

नांदगाव ग्रा.प. सरपंचाला जातिवाचक शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी

Mon Feb 12 , 2024
– कन्हान पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल – कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव (येसंबा) गावातील घटना   कन्हान :- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव (येसंबा) च्या सरपंचाला सार्वजनिक ठिकानी जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिली. असून आरोपी प्रशांत जगन ठाकरे रा. नांदगांव (येसंबा) यांचेवर ॲट्रासिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांकडून मिळालेली माहिती नुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com