छत्रपती संभाजीनगर शहरातील उड्डाणपुलांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. 90 टक्के कामे पूर्णत्वाकडे गेले आहेत. मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही पुलांची कामे एप्रिल महिनाअखेर पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात जुन्या बीड बायपास, स्वामी हंसराज तीर्थ चौक यासह विविध ठिकाणी कामे सुरु आहेत. स्वामी हंसराज तीर्थ चौकात बायपासच्या नव्या पुलाखालून अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्याची उंची कमी ठेवल्याची तक्रार होती. मात्र, ही उंची 5.50 मीटर इतकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या या कामांपैकी 13 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांपैकी 11 किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे तसेच 4.75 कि.मी. चौपदरीकरण कामांपैकी अडीच कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही कामे एप्रिल महिनाअखेरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com