– भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यात निर्यात क्षेत्राची भूमिका महत्वाची – राज्यपाल रमेश बैस
मुंबई :- भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे तसेच नजीकच्या काळात ५ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्यात क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) या विविध क्षेत्रातील निर्यातक संघटनांच्या शिखर संस्थेतर्फे देण्यात येणारे पश्चिम क्षेत्राचे ‘निर्यात उत्कृष्टता पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२ जून) हॉटेल ताज महाल पॅलेस येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विविध राज्यांमधील लघु, माध्यम व मोठ्या निर्यातकांना तसेच महिला उद्योजिकांना २०२०-२०२१ व २०२१-२०२२ या वर्षांसाठी निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशात विविध क्षेत्रांमधील निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रोत्साहन परिषदा कार्यरत आहेत. या सर्व परिषदा भारताची निर्यात वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून देशाला परकीय चलन मिळवून देणारे निर्यातदार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्याचा आर्थिक विकास वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्यात वृद्धीला प्राधान्य दिले आहे असे सांगून निर्यात प्रोत्साहन आणि व्यापार सुलभीकरण उपक्रमांद्वारे राज्य जागतिक व्यापारात आपला वाटा सातत्याने वाढवत आहे, असे बैस यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे निर्यात प्रोत्साहन धोरण तसेच लॉजिस्टिकस धोरण लवकरच जाहीर होणार असून त्याचा राज्यातील निर्यातदारांना चांगला फायदा होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
निर्यात संघटनेने राज्यातील सर्व विद्यापीठांशी सक्रिय भागीदारी करावी असे सांगताना उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि इतर व्यावसायिक शिक्षण संस्थांनी उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करावे व तरुणांच्या शक्तीचा निर्यात वाढवण्यासाठी उपयोग करावा असे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला फेडरेशनचे अध्यक्ष अश्विनी कुमार, पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष परेश मेहता, राज्याचे विकास आयुक्त व मैत्रीचे अध्यक्ष दीपेंद्र सिंह कुशवाह व FIEO चे अध्यक्ष महासंचालक डॉ अजय सहाय उपस्थित होते.