नागपूर : विद्यार्थी, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर मतदार यांना नियोजितरित्या मतदार यादीत नोंदणी करून घेण्याकरीता प्रोत्साहीत करा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील 18 ते 19 वर्षांच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्ह्यातील एकूण महाविद्यालयांपैकी जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या 50 महाविद्यालयांची निवड करून त्यामध्ये निवडणूक साक्षरता मंच अंतर्गत स्टुडंट, कॅालेज आणि कॅम्पस अॅम्बॅसिडर यांची नियुक्ती करण्यात यावी व त्यांच्याद्वारे मतदार नोंदणीविषयी जागरूकता निर्माण करीत नोंदणी करावी. या कामात उत्स्फूर्त सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी केलेल्या कामाचे डिजिटल स्तरावर डॅाक्युमेंटेशन जमा करून प्रोफाईल तयार करता येईल. तसेच त्यांनी केलेल्या कामाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल, असे देशपांडे पुढे म्हणाले.
स्टुडंट, कॅालेज आणि कॅम्पस अॅम्बॅसिडर नियुक्त करून मतदार नोंदणी व मतदानाविषयी जागरुकता करण्याचे काम करण्याकरिता नागपूर विद्यापीठालाही सहभागी करून त्यांच्याकडून ॲडमिशन फॅार्म देतेवेळी सोबत नमुना क्र. 6 देण्यात येईल तसेच फॅार्म जमा करतेवेळी हा फॅार्म आवश्यक कागदपत्रासह भरून घेण्यात येईल व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कडून मतदार नोंदणी करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौम्या शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसिलदार (निवडणूक) राहुल सारंग, विद्यापीठ प्रतिनिधी पाठक, साखरे उपस्थित होते.