कस्तुरचंद पार्कवरील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे मानांकन

Ø सूर्योदयाच्या साक्षीने नागपुरकरांनी मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्याचा घेतला संकल्प

नागपूर :- स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपले कृतीशिल योगदान द्यावे यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. यातील मतदार साक्षरतेसाठी आज कस्तुरचंद पार्क येथे उगवत्या सूर्याच्या साक्षीने सकाळी 6 वाजता सुरु झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीने मानांकन बहाल करुन नागपुरकरांचा गौरव केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे चावरे, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पद्मश्री सन्मानित डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कस्तुरचंद पार्क मैदानावर सकाळी 6 पासूनच नागपुरकरांनी मतदार जागराच्या या पाठाला शिस्तीची जोड दिली. संयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक ब्लॉकनुसार मतदार विभागून बसले. यात एनसीसीच्या युवा मतदारांनी ड्रेस कोडमध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड अकॅडमीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्षरित्या संपूर्ण कस्तुरचंद पार्क फिरुन उपस्थिती व सहभागाची पाहणी करुन घेतली. इलाईट वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अँबेसेडर अमित हिंगोरानी, इंडिया रिकॉर्ड अकॅडमीचे वरिष्ठ मॅनेजर पी. जगन्नाथन यांनी नागपुरच्या या वैशिष्ट्यपूर्ण मतदार जागराच्या पाठाला रेकॉर्डब्रेक उपस्थितीसह मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर केले.

या पाठाअंतर्गत मतदारांची जबाबदारी व लोकशाहीच्या सशक्तीकरणाबद्दल सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधून जबाबदार नागरिकत्वाची भूमिका समजावून सांगितली. गटविकास अधिकारी, राजनंदिनी भागवत यांनी मतदारांना आपल्या परिसरातील मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन ॲपची सविस्तर माहिती दिली. तहसिलदार रोशन मकवाने यांनी मतदान यंत्राबाबत संपूर्ण माहिती दिली. उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे यांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधा, निवडणूक विभागाची भूमिका याबाबत माहिती करुन दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी युवा मतदानबाबत जागृती अभियानाची संकल्पना मांडली.

भारत निवडणूक आयोगामार्फत यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ने सन्मानित केले आहे. मिशन युवा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मतदार नोंदणी अभियानात 75 हजार युवकांनी आपली नाव नोंदणी मतदार यादीत नोंदवून नागपुरला वेगळे वैभव प्राप्त करुन दिले.

मतदान जागरुकतेच्या पाठासाठी ७५०० मतदारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नागपुरकरांनी याला भरभरुन प्रतिसाद देत उद्दिष्टापेक्षा 1100 संख्येने अधिक हजेरी देवून एकूण ८१०० मतदारांची उपस्थिती यशस्वी करुन दाखविली. यावेळी स्वीप अंतर्गत मतदारांच्या साक्षरतेसाठी व मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने निर्मिती करण्यात आलेली ‘अधिकार है’ ही ध्वनीचित्रफित रिलीज करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व उपस्थित मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात वोटींग करण्याकरिता शपथ दिली. 

या कार्यक्रमास लोकसहभागाचे प्रातिनिधीक प्रतिनिधीत्व म्हणून एशियन खेळाडू ओजस प्रविण देवतळे, क्रिकेटपटू वृदराज राऊत, पारलिंगी कार्यकर्ती विद्या कांबळे, जगातील सर्वात कमी उंचीची ज्योती आमगे, ज्येष्ठ नागरिक सुरेश रेवतकर, आंतरराष्ट्रीय स्वीमींग खेळाडू जयंत दुबळे, माजी सैनिक संजय खंडारे, सफाई कर्मचारी रोशन बन्सोड, संदीप राऊत, पोलीस विभागातील सुशिल धाकटे, आदी क्षेत्रातील प्रतिनिधी यांना निमंत्रित केले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विना परवाना वाळु चौरट्यावर कारवाई, कन्हान पोलिसांचा दंणका..

Sat Apr 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोस्टे अंतर्गत अवैद्यरित्या कन्हान नदीतुन वाळु चोरून साठवणुक करून छोटा हाती वाहणात भरून विना परवाना विक्री करण्या-याना पकडुन कन्हान पोलीसानी तीन लाख साठ हजार पन्नास रूपयाचा मुद्देमाल जप्त करित तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार (दि.५) एप्रिल ला १० वाजता कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असताना उमेश यादव रा. कन्हान पार्टनरशिप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com