– आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई
– निलंबनाच्या कारवाईने अधिकारी वर्गात खळबळ
नागपूर :- चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात कल्पना चव्हाण तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार अडबाले यांच्या नेतृत्वात त्यांच्या विरुध्द अनेकदा आंदोलने करण्यात आली होती. त्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आयुक्त (शिक्षण) पूणे यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची चौकशी केली. त्यात त्या दोषी आढळून आल्या. त्यानंतर चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 10 अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले. मात्र, पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. यावर पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार अडबाले यांनी ५ जुलै २०२४ रोजी सभागृहात केली होती.
तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर आठवडाभरात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले होते. त्यानंतरही सदर प्रकरणाबाबत आमदार अडबाले सतत पाठपुरावा करीत होते.
काल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या शासन आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करीत आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत त्या निलंबित राहतील, असे आदेशात म्हटले आहे. या कारवाईमुळे शालेय शिक्षण व अन्य विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे.
यासोबतच आमदार सुधाकर अडबाले यांच्या तक्रारीवरून विदर्भातील बेशिस्त शिक्षणाधिकारी / अधिकारी यांचीही चौकशी सुरू असून लवकरच त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई होईल. आमदार अडबाले यांनी एकाच वर्षांत केलेल्या या कारवाईमुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
विदर्भातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा व अनियमितता करणाऱ्या शिक्षणाधिकारी/अधिकारी यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनीयावेळी सांगितले.