राष्ट्रीय सफाई कर्मचारी, वित्त आणि विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या वित्तीय संस्थेचे नियोजन
चंद्रपूर 30 ऑगस्ट – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सफाई कर्मचारी, वित्त आणि विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या वित्तीय संस्थेमार्फत आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान राज्यातील संभाव्य स्वच्छता उद्यमींकरीता सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महानगरपालिका, नगर परिषद,नगरपंचायत क्षेत्रातील पात्र उमेदवारांची यादी महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयास संबंधित कार्यालयांनी सादर करावयाची आहे.
राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेचे काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत स्वच्छता आणि सफाई कर्मचारी तसेच मैला वाहून नेण्यापासून मुक्त करण्यात आलेले सफाई कर्मचारी यांच्या शाश्वत उपजीविकेची सोय करण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी, वित्त आणि विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या वित्तीय संस्थेच्या यंत्रणांद्वारे स्वच्छता उद्यमी योजना -एसयूव्ही अंतर्गत संबंधित निश्चित गटांना सार्वजनिक स्वच्छतेशी उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय सहाय्य प्रदान करते. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थादेखील स्वछतेशी निगडीत यांत्रिकीकरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेशी उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी तसेच आवश्यक व्यवहार्यता अंतर भरून काढण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. ज्यास्तीत ज्यास्त सफाई कर्मचाऱ्यांना लाभ मिळवुन देणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थेची दखल स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत घेतली जाणार आहे. पात्र स्वच्छता उद्यमींनी चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभाग मुख्य कार्यालय किंवा संतोष गर्गेलवार 9011061182, गिरिराज प्रसाद मो. क्र. 7000899495 येथे संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.