लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

– कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष

– रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे

– आज रवाना होणार मतदान पथके

– बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन

नागपूर :- नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, तहसिलदार (निवडणूक) वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर न्यावयाची आहे. यासाठी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. विशेषतः नागपूर बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूरात यावे. मतदान शपथ, मॅरेथॅान, बुथ अवेरनेस ग्रुप, सोसायटी कनेक्ट अशा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी जरूर सहभागी व्हावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.

रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे

जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके उद्या, दि. 18 एप्रिल रोजी मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.

12 महिला मतदान केंद्रे

दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.

सी व्हिजिल ॲपवर 64 तक्रारी

सी व्हिजिल या ॲपवर 64 तक्रारींची नोंद करण्यात आली. यात 20 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 44 तक्रारींचे निरसन करण्यात आले.

देवलापार येथे आदिवासी मतदार केंद्र

देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार आहे. मतदान सुरू होताच सुरुवातीच्या मतदारांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांग, युवा अशी विशेष मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच काही मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर मतदान केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हर देशवासी का यह फर्ज है कि वह अपने मताधिकार का प्रयोग जरूर करें - बी सी भरतीया

Thu Apr 18 , 2024
नागपूर :- हमारे देश को कौन चलाएगा, उसे चुनने का पूरा अधिकार हमारे संविधान ने आम देशवासी को दिया है। देशवासियों को पूरा संवैधानिक अधिकार है कि वह चुनाव में खड़े उम्मीदवारों में से अपने पसंद का उम्मीदवार के प्रति समर्थन दे सकते हैं। हर देशवासी का यह फर्ज है कि वह अपने मताधिकार का प्रयोग जरूर करें। ऐसा कनफेडरेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com