Ø पोस्टमास्टर जनरलच्या हस्ते वाटप
Ø मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
यवतमाळ :- भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना बँकेचे आधार सीडेड बँक अकाउंट क्युआर कार्डचे वितरण करण्यात आले. सदर वितरण नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्याहस्ते झाले.
यावेळी यवतमाळ डाक विभागाचे अधीक्षक गजेंद्र जाधव, नागपूर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक संचालक दिलीप खाडे, सहाय्यक अधीक्षक जयंत दाऊ, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यवतमाळ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक चित्रसेन बोदीले, व्यवस्थापक अमोल रंगारी उपस्थित होते. बँक अकाउंट क्युआर कार्ड सुपूर्द करण्यात आलेल्या लाभार्थी महिला शिलाताई दिलीप देवपारे, शितल गणेश मुडे, कोमल शिवदास काणेकर उपस्थित होत्या.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे विस्तृत नेटवर्क आहे. खाते काढण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणतेही कागदपत्र जमा करावे लागत नाही. फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. बायोमेट्रीक मशिनद्वारे लाभार्थ्यांचा अंगठा लावून काही वेळातच खाते उघडून दिल्या जाते.
लाभार्थी महिला नजीकच्या पोस्ट कार्यालयात किंवा गावात येणाऱ्या पोस्टमनशी संपर्क साधून देखील खाते उघडू शकतात. जास्तीत जास्त महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक खाते काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.