नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरु केलेल्या अभय योजना 2024 ला ग्राहकांकदून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून अवध्या 4 दिवसांत या योजने सहभागी होण्यास नागपूर परिमंडलातील तब्बल 134 ग्राहकांनी संमती दर्शविली आहे. या ग्राहकांकडे 99 लाख 76 हजाराची थकबाकी असून या योजनेमुळे त्यांच्याकडील व्याज आणि विलंब आकाराचे 22 लाख 20 हजार रुपये माफ़ होणार आहेत, यात नागपूर जिल्ह्यातील 110 तर वर्ध जिल्ह्यतील 24 ग्राहकांचा समावेश आहे.
या 134 ग्राहकांपैकी 90 लाख 17 हजारांची थकबाकी असलेल्या 107 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा एकरकमी करण्यास संमती दिलेली असून त्यापैकी 47 ग्राहकांनी 9 लाख 75 हजाराच्या रकमेचा भरणा देखील केला आहे तर उर्वरीत 27 ग्राहकांनी हफ्त्याने थकबाकी भरण्यास सहमती प्रदान केली असून त्यापैकी 10 ग्राहकांनी 1 लाख 58 हजाराचा भरणा केलेला आहे. अभय योजनेत सहभागी झालेल्या या ग्राहकांपैकी 61 ग्राहकांनी खंडित वीज पुरवठा परत जोडण्यासाठी आणि 41 ग्राहकांनी नवीन वीज जोड्णीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून महावितरणने ही सवलतीची योजना लागू केली आहे
राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठीच ही योजना असून यात कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 आहे. या योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळत असून जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत दिल्या जात आहे.
असा लाभ घ्या
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या वीज ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही विस्तृत माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येणार असून. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.