– काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ?
सांगली :- महाराष्ट्र,मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही.काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे,असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना काही परखड सवालही केले. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना या ना त्या प्रकारे रेटून खोटे बोलत राज्यात अशांतता पसरवण्याचा ‘मविआ’ चा कट आहे अशा शब्दात बावनकुळे यांनी काँग्रेस, मविआ वर टीकास्त्र सोडले.
बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरून मविआ आणि काँग्रेसने नेहमीच हीन दर्जाचे राजकारण केले आहे.मात्र याच काँग्रेसने अनेकदा शिवरायांचा अपमान केला आहे. या घटनांबद्दल राहुल गांधी कधी उत्तर देणार का…या घटनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का असे विचारत काँग्रेसकडून झालेल्या शिवरायांच्या अवमानाच्या अनेक दुर्दैवी घटनांची आठवण त्यांनी करून दिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख लुटारू राजा असा केला होता. काँग्रेसचे कमलनाथ हे मध्य प्रेदशचे मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी ने हटवला होता. मविआ चे घटक पक्ष छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडून पुरावे मागतात. शाहिस्तेखान,अफझलखान नसते तर शिवरायांची ओळख नसती असे वक्तव्य करण्याचे धाडस करतात.त्यावेळी राहुल गांधींनी शिवरायांची,महाराष्ट्राची माफी मागितली नव्हती. हाच काँग्रेस पक्ष आणि मविआ शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करत राज्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
सांगली येथे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे वक्तव्य केले होते .त्याचा खरपूस समाचार घेत बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिला भगीनींना काँग्रेसचे खासदार निवडून दिलेत तर बँक खात्यात खटाखट 8.5 हजार टाकू असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल राहुल गांधी महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागणार का, असा सवालही बावनकुळे यांनी केला.
कर्नाटक,तेलंगणा या काँग्रेस शासित राज्यात लाडकी बहीण सारख्या योजना बंद केल्या गेल्या आहेत.राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळवून दिला. या योजनेच्या यशामुळेच ‘मविआ’ च्या पायाखालची जमीन सरकली असून आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा बेछूट खोटे बोलणे सुरू केले आहे .राज्य हे विकासाच्या प्रगतीपथावर जात असताना विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी संविधान,जातीय जनगणना हे मुद्दे उकरून काढत पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग मविआ करत आहे. येनकेन प्रकारेण राज्यात अराजक पसरवण्याचा गलिच्छ प्रयत्न शरद पवार,राहुल गांधी,संजय राऊत करत आहेत,असेही बावनकुळे यांनी सांगितले.