नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समतोल प्रादेशिक विकासाचा दृष्टीकोन पुढे नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 15 जून रोजी एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) पुरस्कार सुरु केले आहेत. एक जिल्हा एक उत्पादन दृष्टीकोनातून ज्यांनी आपले संबंधित जिल्हे, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय मिशनमध्ये आर्थिक विकास साधण्यासाठी अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले आहे, त्यांना ओळख मिळवून देणे आणि त्यांचा सत्कार करणे, हे या प्रतिष्ठित पुरस्कारांचे प्रयोजन आहे.
या पुरस्कारांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 जून 2023 रोजी सुरू झाली असून, 31 जुलै 2023 पर्यंत ती खुली राहील. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश, जिल्हा प्रशासन आणि परदेशातील भारतीय मिशन पुरस्कारांसाठी अर्ज भरायला पात्र आहेत आणि त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन आणि परदेशातील मिशन्सनी या पुरस्कारांसाठी सक्रियपणे अर्ज भरावेत, असे आवाहन केले जात आहे, ज्यामुळे एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमा अंतर्गत नवोन्मेष आणि प्रभावी सार्वजनिक सेवा वितरणाला चालना देणारा एक वस्तुपाठ निर्माण होईल.
देशातील सर्व जिल्ह्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणे, हे ओडीओपी उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामधील एक उत्पादन निवडणे, त्याचे ब्रँडिंग करणे आणि त्याचा प्रचार करणे, निवडलेल्या प्रत्येक ओडीओपी उत्पादनाची बाजारपेठ आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी, संबंधित उत्पादनाच्या पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्यावरील समस्या ओळखून त्याचे निराकरण करणे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
पुरस्कारासाठी अर्ज भरण्याची लिंक पुढील प्रमाणे: https://awards.gov.in/Home/AwardLibrary