नागपूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी व 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरून पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहसंचालकांनी शेतकऱ्यांना केले आहे.
प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पध्दतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्यांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.