– शेकापूर येथे कला व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
– विद्यार्थ्यांनी नृत्य कला अविष्कारातून जपली संस्कृती
कोंढाळी :- तालुक्यातील आदिवासी बहुमूलक जंगल व्याप्त क्षेत्रातील शेकापूर गावात गट ग्रामपंचायत, गणेशपुर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट ग्रामपंचायत, गणेशपूर येथील सरपंच संजीवनी मडके तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख राम धर्मे, आंबेडकरी विचारवंत नरेंद्र डोंगरे, प्रगत आदिवासी ग्रामविकास दक्षता समिती अध्यक्ष मधुकर बढेकर, प्रा. रवी सोमकुंवर, गरमसुर शाळेचे मुख्याध्यापक माणिक नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर वैद्य, पोलीस पाटील हरिदास नागपूरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश मडके, ग्रामपंचायत सदस्य सुनिता वैद्य, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कौरती प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संविधान, आदिवासी संस्कृती, गणेश वंदना, शिवआराधना, शिवाजी महाराज, जोगवा, राजस्थानी नृत्य, लावणी इत्यादी कलाविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
केंद्रप्रमुख राम धर्मे यांनी विद्यार्थ्यांच्या नृत्यकलेचे कौतुक करताना सांगितले की, “नृत्य ही केवळ कला नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून केवळ संस्कृतीचे जतन होत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना या गुणांचा विकास होतो.”
यावेळी गट ग्रामपंचायत, गणेशपुरतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेकापूरला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा लाभ मिळण्याकरिता इंटरऍक्टिव्ह बोर्ड व साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोचे, संचालन शिक्षक राजेंद्र टेकाडे यांनी तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका मनिषा धुर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोहिणी धुर्वे, रामकृष्ण राउत, योगेश वैद्य, मनोहर बढेकर, विलास नेहारे, सुनिल कोडापे, बादल बगारे आदींनी सहकार्य केले.