शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा – कृषी सहसंचालक अंकुश माने

– विमा काढण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 

नवी मुंबई :- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा काढण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 आहे, अशी माहिती कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे.

खरीप हंगाम २०२४ करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी, उडिद या पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही माने यांनी कळविले आहे.

ठराविक पिकांकरिता अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.

ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 51760/-, रत्नागिरी जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 50000/-., ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नाचणी पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 20000/-., पालघर जिल्हा उडीद पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 25000/-.

ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल.

खरीप हंगाम 2024 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै, 2024 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीक विमा अँप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करता येईल.

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Wed Jun 19 , 2024
– राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना मुंबई :- राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने तंतोतंत पालन करावे आणि त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कबड्डी खेळ रूजवावा – वाढवावा यासाठी प्रयत्न करावे. कबड्डीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com