– धावत्या रेल्वेतून पडून ट्रक चालकाचा मृत्यू
-छत्तीसगढ एक्सप्रेसमधील घटना
नागपूर :- धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या पार्थिवावर गुरूव्दारा कमिटीच्या सहकार्याने गंगाबाई घाट येथे अंन्त्यसंस्कार करण्यात आले. नेदरासिंग पुरनसिंग (70), रा. अमृतसर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना नरखेड रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
नेदरासिंग हे ट्रक चालक आहेत. रायपुरला काम मिळाल्याची माहिती त्यांनी घरी दिली आणि रायपूरसाठी रेल्वेने निघाले. छत्तीगढ एक्सप्रेसने प्रवास करीत असताना मध्यरात्री अचानक त्यांचा तोल गेला आणि खाली पडले. मागून येणार्या मालगाडीच्या लोकोपायलटने ही माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यांच्या मार्फत नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाली. एएसआय विजय मरापे आणि पोलिस शिपाई अमोल हिंगवे यांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृताजवळ आधार कार्ड, मोबाईल आणि 500 रुपये मिळाले. फोनव्दारे मृताच्या नातेवाईकांना सुचना देण्यात आली. मृताचा भाउ, बहिण आणि भाचा नागपुरात आले.
मृताचे कुटुंब अंन्त्यसंस्काराचा खर्चही उचलू शकत नव्हते. त्यामुळे विजय मरापे यांनी गड्डीगोदाम येथील गुरूव्दारा कमिटीशी संपर्क साधला. कमिटीचे अध्यक्ष सुखविंदरसिंग आणि सचिव मेजरसिंग यांनी अंन्त्यसंस्कार तसेच मृताच्या नातेवाईकांचा खर्च उचलला. शनिवारी सकाळी मृताच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांना अमृतसर जाण्याची व्यवस्थाही गुरूव्दारा कमिटीने केली. अस्थि घेवून नातेवाईक अमृतसरला रविवारी सकाळी निघणार आहेत.