सकारात्मकता हाच यशाचा मूलमंत्र – संपादक नानक आहुजा

अमरावती :- विद्यार्थांनी नेहमी सकारात्मक विचार अंगीकारावे. सकारात्मक विचारांची माणसे जीवनात यशस्वी होतात. नकारात्मक भावना अपयशाची लक्षणे आहेत. त्यामुळे यश प्राप्तीसाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत दैनिक प्रतिदिन अखबार आणि वृत्त केसरीचे प्रबंध संपादक नानक आहुजा यांनी व्यक्त केले.भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात ‘संपादक संवाद’ उपक्रमाअंतर्गत दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नानक आहुजा ‘माध्यम व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय संचालक प्रा.(डॉ.) वीरेंद्र भारती होते. यावेळी विचारमंचावर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती हुसेन सुभेदार यांचे सह प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, डॉ. आशिष दुबे उपस्थित होते.

पुढे बोलताना नानक आहुजा म्हणाले, उत्तम माध्यम व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचार, सर्वसमावेशक दृष्टी, कर्मचाऱ्यांशी चांगला समन्वय, जागरूकता आणि व्यावसायिक व सामाजिक भान हे तत्व स्वीकारणे गरजेचे आहे. सकारात्मक विचारांची पत्रकारिता नेहमी जीवंत राहते. त्यामुळे विद्यार्थांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करताना सकारात्मक विचारांना आत्मसात करावे. पत्रकारितेचे क्षेत्र हे अतिशय जबाबदारीचे आहे , यात जागरूकपणे काम करावे लागते. वृत्तपत्र आणि टीव्ही दोघांचे जग हे वेगवेगळे आहे. तुलनेने वृत्तपत्रात कार्य करताना अधिक सजग असावे लागते. त्यामुळे पत्रकारितेत कार्य करताना जागरूकपणे कार्य करावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी विद्यार्थांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून व्यवस्थापनचे बारकावे समजून घेतले.

अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती म्हणाले, लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाच्या हिताचे रक्षण करणे पत्रकारितेचा मुख्य हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी उत्तम व्यवस्थापन तितकेच गरजेचे आहे. माध्यमांच्या क्षेत्रात नवंनवीन बदल होत आहेत. बदलत्या काळात माध्यम व्यवस्थापकांची मागणी अधिक वाढली आहे. या क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी विशेष कौशल्य आत्मसात करावी लागतील, चांगला टेक्नोसॅव्ही विद्यार्थी एक कुशल व्यवस्थापक देखील बनू शकतो. त्यामुळे विद्यार्थांनी तांत्रिक कौशल्य अधिकाधिक आत्मसात करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

सुरुवातीला विद्यार्थांनी काढलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रायोगिक वृत्तपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. राजेश कुशवाहा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद निताळे यांनी तर आभार डॉ. आशिष दुबे यांनी मानले.

यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com