– स्थानकावर वाढले प्रकार, विद्यार्थ्यांना बसतो आर्थिक भुर्दंड
नागपूर :- मेट्रोमध्ये तिकीट दरवाढ केल्यानंतर गर्दी कमी झाली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी परत खेचण्याकरिता मागील महिन्यात विद्यार्थ्यांना सवलत देण्याची सुरुवात करण्यात आली. मात्र, एक महिना होत नाही तोच विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवूनही सवलत दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढला आहे.
नागपूर मेट्रोच्या चारही मार्गिका सुरू झाल्यावर महामेट्रोने महिन्याभरात तब्बल चार वेळा तिकीट दरात वाढ केली होती. यामुळे सर्वच वर्गात नाराजीचे सुरू होते. त्यानंतर महामेट्रो व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट दरात घट करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे पदवीपर्यंत शिकणार्या विद्यार्थ्यांनाही सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिकीटदरात ३० टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे त्यावर्षीचे आयडी कार्ड दाखवावे लागते. मात्र मेट्रो स्थानकावरील तिकीट काउंटरवर महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवूनही विद्यार्थ्यांना तिकिटामध्ये सवलत देण्यास नकार देत आहेत.
कडबी चौक आणि लोकमान्यनगर स्थानकावर काही विद्यार्थिनींना सवलत दिली गेली नाही. सध्या अनेक महाविद्यालयातील परीक्षा सुरू आहे. परीक्षा केंद्र हे महाविद्यालयापासून पाच ते सहा किमी अंतरावर असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जात असतात. मेट्रो स्थानकावरील कर्मचारी महामेट्रो व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाला जुमानत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. येथील काउंटरवर असलेले कर्मचारी महाविद्यालयाचे ओळखपत्र चालत नसून बोनाफाईड प्रमाणपत्राची मागणी करीत असतात. यामुळे तिकीट घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याचे पूर्ण शुल्क देऊनच तिकीट विकत घ्यावी लागत आहे.
‘सध्या परीक्षा सुरू आहे. आम्ही महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवून तिकीट सवलत मागितली. मात्र गुरुवारी परीक्षा संपल्यानंतर येथील काउंटवरील कर्मचार्यांनी ओळखपत्र नाही चालत, सवलत हवी असेल तर बोनाफाईड आणा असे सांगितले. त्यामुळे पूर्ण पैसे देऊनच तिकीट घ्यावे लागले. त्यानंतर दुसर्या दिवशी परीक्षेसाठी कडबी चौक येथे असाच प्रकार घडला.’
-अश्विनी पाटील-विद्यार्थिनी’
रजिस्टरवर माहिती लिहिण्याचाही प्रकार
विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून सूट मागितल्यास त्यांना रजिस्टर्डवर नाव, मोबाईल क्रमांक, महाविद्यालयाचे नाव, कुठे जात आहेत आदी नोंदणी करण्यास सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी माहिती लिहायची की मेट्रो वेळेवर प्रवास करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा प्रकारामुळे त्यांना नियमित वेळेत पोहोचण्यासही उशीर होऊ शकतो.