नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण  – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन

– रासेयो राज्यस्तरीय प्रेरणा शिबिराचा समारोप

नागपूर :-नेतृत्व गुण हे पुस्तकांमधून वाचून किंवा कोणी सांगितले म्हणून प्राप्त होत नाही. प्रत्यक्ष व्यवहार तसेच अनुभवातून नेतृत्व गुण विकसित होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेरणा-२०२३ हे राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीर सोमवार, १३ मार्च ते शुक्रवार, १७ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले. पाच दिवसीय प्रेरणा शिबिराचा समारोप शुक्रवार, १७ मार्च रोजी कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक शिबिराकरिता आल्याने त्यांचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी अभिनंदन केले. या पाच दिवसांमध्ये नेतृत्व गुणाबाबत बाबी अनुभवल्या असतील. त्याचा पुढील जबाबदाऱ्या पार पडण्याकरिता उपयोग करा असे कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले. आपण शिक्षण घेतो म्हणजे नेमके ज्ञान मिळते. मात्र व्यावहारिक ज्ञान हे बाहेरील जगातून, वातावरण तसेच व्यवहारातून मिळते. त्यामुळे जीवन शिक्षण फार महत्त्वाचे असल्याचे कुलगुरू म्हणाले. यावेळी कुलगुरू यांनी तीन प्रकारच्या व्यक्ती विशेष बाबत माहिती देखील शिबिरार्थींना दिली. जे व्यक्ती मिळालेल्या संधीचं सोनं करतात, त्या संधीतून त्यांना विविध ज्ञान प्राप्त होत असून त्याचा थेट लाभ त्यांना मिळतो. नोकरी मिळणे हा प्रसंग असला तरी घेतलेल्या अत्याधिक श्रमातून ज्ञानाचे मोठे भांडवल त्या व्यक्तीकडे जमा होते. स्वतःहून जबाबदारी घ्या तुमच्यामध्ये क्षमता निर्माण होईल असे कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले. शताब्दी वर्ष निमित्ताने विद्यापीठ राबवित असलेल्या ‘ग्राम चलो अभियानाची’ माहिती देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी ते तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.

शिबिरातून नेतृत्व गुणविकास – प्र-कुलगुरु डॉ. दुधे

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून नेतृत्व गुणविकास होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. शिबिरार्थी म्हणून ५ दिवस काय शिकलात याबाबत मनोगत ऐकत होतो, योगा ते शिक्षण हे नेतृत्व गुण रासेयोने दिले, याबाबत समाधानी आहात असे दिसून येत आहे. शिबिरातून सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. मात्र, आपणामध्ये ती स्वीकाहार्य प्रवृत्ती असणे गरजेचे असल्याचे डॉ. दुधे म्हणाले. यावेळी आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू यांनी स्वतःमधील युएसपी शोधून चेंज मेकरच्या भूमिकेतून शिबिरार्थींनी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी नांदेड येथील डॉ. कल्पना जाधव व सोलापूर येथील डॉ. समाधान गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सोबतच शिबिरार्थी यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील अभिषेक दैठणकर व आरोग्य विद्यापीठ नाशिक येथील साक्षी जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत आभार मानले. प्रस्ताविकातून विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी पाच दिवसातील शिबिरातील कार्यक्रमांचे अहवाल वाचन केले. समारोपिय कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोद खेडकर यांनी केले तर आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले.

विद्यार्थ्यांनी पटकावले पुरस्कार

पाच दिवस घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शिबिरार्थींनी पुरस्कार पटकावले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार छत्रपती संभाजी नगर येथील अभिषेक दैठणकर, द्वितीय पुरस्कार सोलापूर येथील सौरभ वाघमारे तर तृतीय पुरस्कार अथर्व मात्रे याने प्राप्त केला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार पुणे येथील क्रांती खरात, द्वितीय पुरस्कार नांदेड येथील अंजली शहाणे तर तृतीय पुरस्कार अकोला येथील गौरव घाटोळ याने प्राप्त केला. देशभक्तीपर स्पर्धेत प्रथम पुरस्कार दर्शन, द्वितीय पुरस्कार आदित्य तर तृतीय पुरस्कार सर्वेशने प्राप्त केला. लोक नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिहिका, द्वितीय पुरस्कार अमरावतीची वंशिका सिरसाम तर तृतीय पुरस्कार पूनम वानखडे हिने प्राप्त केला. लोकगीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार अमरावती येथील ऋतुजा, द्वितीय पुरस्कार पवन तर तृतीय पुरस्कार कामाक्षी, सर्वेश व नेहा यांनी संयुक्तपणे प्राप्त केला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com