मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2023 रोजी, अमेरिकी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅकार्थी, सिनेटचे बहुमतातले नेते चार्ल्स शुमर, सिनेटचे रिपब्लिकन पक्षाचे नेते मिच मॅकॉनेल, आणि सिनेटचे डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते हकीम जेफ्रीस, या मान्यवरांनी त्यांना या भाषणासाठी निमंत्रीत केले होते.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस देखील यावेळी उपस्थित होत्या.
कॅपिटल हिल इथे पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर संसदेच्या नेत्यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर, सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅकार्थी आणि संसदेच्या इतर नेत्यांशी, पंतप्रधानांच्या स्वतंत्र बैठका झाल्या.
भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकी संसदेने दीर्घकालीन आणि भरभक्कम द्विपक्षीय पाठबळ दिल्याबद्दल, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कौतुक केले.
भारत आणि अमेरिकेने आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झपाट्याने केलेल्या प्रगतीचा आपल्या भाषणात उल्लेख करत, पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबतचा त्यांचा दृष्टीकोन संसदेसमोर मांडला. भारताने घेतलेली प्रगतीची मोठी झेप आणि जगासाठी भारत उपलब्ध करुन देत असलेल्या संधींची रूपरेषाही त्यांनी यावेळी सादर केली.
सभापती मॅकार्थी यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्वागत समारंभ आयोजित केला. अमेरिकी संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे दुसरे भाषण ठरले. यापूर्वी त्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या अधिकृत अमेरिका दौऱ्यात, अमेरिकी संसदेला संबोधित केले होते.