नवी दिल्ली :- सरकारी अथवा खासगी क्षेत्रात योग्य नोकरी मिळवण्यासाठी आणि/किंवा नामांकित तांत्रिक आणि व्यावसयिक उच्च शिक्षण संस्थांमध्ये खात्रीशीरपणे प्रवेश मिळवण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यात उत्तम यश मिळवण्यासाठी अनुसूचित जाती तसेच इतर मागासवर्गीयांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण मंत्रालय अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण योजना राबवत आहे. केंद्रीय विद्यापीठांमध्ये स्थापन केलेल्या डॉ. आंबेडकर उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून वर्ष 2023-24 पासून डॉ.आंबेडकर फाउंडेशन (डीएएफ) या योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून निधी वितरित करण्यात येतो. आजघडीला, देशातील 17 केंद्रीय विद्यापीठांनी प्रशिक्षणासाठी डॉ.आंबेडकर फाउंडेशनशी (डीएएफ) सामंजस्य करार केले आहेत. इतर केंद्रीय विद्यापीठे भविष्यात डीएएफशी सामंजस्य करार करून या योजनेत सहभागी होऊ शकतात.
योजनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नागरी सेवा परीक्षांसह इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील प्रशिक्षण मिळण्याची तरतूद सदर योजनेत आहे. यासंदर्भातील अधिक तपशीलासाठी कृपया पुढील संकेतस्थळांचा वापर करावा:
coaching.dosje.gov.in, https://socialjustice.gov.in/schemes/30.
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तराद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए.नारायणस्वामी यांनी आज ही माहिती दिली.