– स्वच्छता रॅली, पथनाट्य, मानवी साखळी द्वारे स्वच्छतेबाबत केले जागरूक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने धरमपेठ झोनमधील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात आले. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून देणे आणि समाजात स्वच्छतेची चांगली सवय रुजविणे, या उद्देशाने संपूर्ण शहरात हे अभियान राबविण्यात येत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये धरमपेठ झोनमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, झोनल अधिकारी दिनदयाल टेंभेकर उपस्थित होते.
धरमपेठ झोनमधील स्वच्छता जनजागृती अभियानामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि मनपा कर्मचारी सहभागी झाले. या रॅलीमधून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आणि स्वच्छतेला जीवनाचा भाग बनवण्याचे संदेश देण्यात आले.
विविध ठिकाणी पथनाट्य देखील सादर करण्यात आले. या पथनाट्यांद्वारे ‘माय पॉकेट माय बिन’ आणि ‘कचरा व्यवस्थापन’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर संदेश देण्यात आले. नागरिकांना कचरा सार्वजनिक ठिकाणी न फेकता कचरा पेटीत टाकण्याचे, तसेच कचरा पेटी नसल्यास कचरा आपल्या खिशामध्ये ठेवून योग्य ठिकाणी फेकण्याचे महत्त्व सांगितले. धरमपेठ झोनमधील विविध प्रभागांमध्ये ‘स्मार्ट टॉयलेट्स’वर स्वच्छतेबाबत जागरूकता अभियान राबविण्या आले. या अभियानात सार्वजनिक शौचालयांचा योग्य वापर, स्वच्छतेचे महत्त्व आणि स्वच्छतेला सवय म्हणून स्वीकारण्यावर भर देण्यात आला. स्वच्छतेबद्दल एकता आणि प्रतिबद्धता दर्शवण्यासाठी प्रत्येक प्रभागात मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि अधिकारी सहभागी झाले आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे. सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे. स्वच्छ शौचालयांचा योग्य वापर वाढविणे. स्वच्छतेला समाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे, हा या अभियानाचा उद्देश होता. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली. विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांनी स्वच्छता मोहिमेतील भागीदारी दर्शवली आहे. ही मोहीम नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.