संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी पत्रकार संघातर्फे तहसिलदारला निवेदन सादर
कामठी :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रविवारी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांना महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीत संबोधित करताना पत्रकार हा ही एक मतदार आहे.त्यांचा विविध मतदारांशी थेट संपर्क असतो तेव्हा मतदारात भाजप पक्षाविषयी काय मत आहेत यावर संवाद साधून त्यांचे मते जाणून घेत मतदारात सकारात्मक संदेश जावा तसेच 2024 पर्यंत भाजपच्या विरोधात कुठलीही बातमी लागू नये यासाठी पत्रकारांना धाब्यावर न्या ,चहा पाजा अशा प्रकारची पत्रकारविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याचा निषेधार्थ कामठी पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू नारनवरे यांच्या नेतृत्वात आज कामठी तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
2024 ला होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक मोडवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पक्षाच्या विरोधात बातमी छापून येऊ नये यासाठी त्यांना धाब्यावर न्या, चहापाणी करा असे बेताल व्यक्तव्य करून महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकारांचाच अपमान केलेला असून यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्याची समज घेत पत्रकाराविषयी बेताल वक्तव्य टाळावे तसेच या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ कामठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करीत निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी कामठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडु नारनवरे,वरिष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ,सतीश दहाट, संदीप कांबळे,निलेश रावेकर,योगेश शर्मा,सुनिल चलपे आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.