– वांगचूक यांनी साधला नागपूरकर पर्यावरणप्रेमींशी मनमोकळा संवाद
– सरकारला बदलण्याचा सर्वात चांगला उपाय आहे स्वत:ला बदला – सोनम वांगचूक
नागपूर :- चार वर्षांपूर्वी मी चीनच्या विरोधात बोललो ते व्हिडीयोज यूट्यूबवरुन गायब झाले,यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या पर्यावरणीय धोरण व लद्दाखविषयी देखील मी मत व्यक्त केले,ते व्हिडीयोज शोधल्यावरही यूट्यूटबवर सापडत नाही,माझ्या नावाने खूप शोधल्यानंतर कधीतरी सापडतात,असे धक्कादायक विधान सुप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी आज केले. पर्सिसटन्स येथील सभागृहात लद्दाखचे नागपूरातील विद्यार्थी व नागपूरातील पर्यावरणवाद्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.या कार्यक्रमाचे आयोजन फ्रेंड्स ऑफ लद्दाख व फ्रेंड्स ऑफ नेचर (FOLFON)यांनी केले होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,भौगोलिक व नैसर्गिकरित्या लद्दाख हा भारतातील इतर राज्यांपेक्षा फार वेगळे राज्य आहे.अनेकांचा हा गैरसमज आहे की असाम,उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश इत्यादी सारखा लद्दाख हे हिमालयाच्या कुशीत असलेले राज्य आहे मात्र,वास्तवतेत लद्दाख हा हिमालयाच्या पलीकडील लहानसे राज्य आहे ज्याची लोकसंख्या अवघी तीन लाखांच्या जवळपास आहे.लद्दाख हा एखाद्या मंगळ किवा चंद्र ग्रहासारखा भू-भाग आहे.आपल्या भौगोलिक संरचनेमुळे पावसाचे ढग हे हिमालयावरच रिते होत असल्याने लद्दाखमध्ये वर्षभरातून अवघे फक्त काही दिवस काही इंचच पाऊस पडतो.पाण्या अभावी येथील जमीन वाळवंटासारखी आहे.मात्र,आमचे पूर्वज जे कोणी या जमीनीवर येऊन वसले ,त्यांनी काळाच्या किती तरी पुढील तंत्रज्ञान वापरुन पावसाच्या तितक्याच पाण्याचा उपयोग करुन हा भू-भाग माणसांना राहण्यायोग्य बनवला.थंडीत येथील न्यूनतम तापमान उणे ३५ अंश तर गर्मीत अधिकतम तापमान प्लस ३५ अशं एवढे आहे.‘जंगल मे मंगल’ही म्हण ऐकली असेल मात्र,आमच्या पूर्वजांनी लद्दाख नावाच्या भू-भागावर ‘मंगल मे जंगल’उगवण्याची किमया साधली.नैसर्गिकरित्या ज्या भू-भागावर काहीच नाही उगवायला हवे होते,आमच्या पूर्वजांनी अगाध परिश्रमातून लद्दाखला हिरवळीचे बेट केले.ढगातून वर्षभरातून फक्त चार इंच पाणी पडत होते,ते वर्षभर साठवून ठेवण्याची किमया त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेतून साधली.
लद्दाख हे असे राज्य आहे ज्याने शंभर वर्षांपूर्वीच हिमनद्यांच्या टेकड्यांमध्ये माणसाला जगवणे शिकवले.या हिमनद्यांमधून अत्यंत हळूवार पद्धतीने वर्षभरात फक्त काही इंच बर्फ वितळून पाणी खाली येत होते.आमच्या पूर्वजांनी त्या पाण्यातूनच वाळवंटात शेती फूलवली.प्रत्येक प्रकारचे फळ-भाज्या लद्दाखमध्ये उत्पादित होतात.केवळ पाण्याचा दुष्काळच नाही तर लद्दाखमध्ये प्राणवायूची देखील कमतरता आहे.तरी देखील आमचे पूर्वज अश्या परिस्थितीत जगले नाही, तर शेती देखील फूलवली.याशिवाय संगीत,धर्म,रंगबिरंगी कला,संस्कृतीचा देखील उगम अश्या विपरित परिस्थितीत झाला,काळओघाने बहरला.
आमचे लद्दाख हे सततचा महापूर आणि दुष्काळाचेच राज्य आहे.अशातच गेल्या काही दशकांपासून लद्दाखला जागतिक तापमानाच्या(ग्लोबल वार्मिंग)च्या समस्येने ग्रासले.तेथील हिमनद्या या वितळू लागल्या आहेत.उत्तरी ध्रृव व दक्ष्ण ध्रृव याप्रमाणेच तिसरे ध्रृव हे हिमालय आहे जे फक्त बर्फाने आच्छादित आहेत.हिमालयात किमान पन्नास हजार हिमनद्या आहेत.जागतिक तापमान आटोक्यात न आल्यास एक दिवस या सर्व नद्या आटून जातील.एक चर्तुतांश लोकसंख्या ही संकटात येईल,विस्थापित होईल,असे भाकीत त्यांनी वर्तवले.
नागपूर असो किवा यूरोप,त्यांच्या तापमान वाढीमुळे लद्दाखवर परिणाम होतो कारण गर्मी वाढत आहे.उत्तराखंड,उत्तर प्रदेश,आसाम,अरुणाचल प्रदेश,काश्मीर कोणताही भाग असो कारखाने,वाहने,बांधकाम इत्यादी कारणांमुळे निर्माण होणा-या कार्बन उत्सर्जनातून प्रचंड प्रमाणात प्रदुषणाचे ढग हे अंतराळात जमा होत जातात,जे उंच अश्या हिमनद्यांवर जाऊन बसतात.त्यामुळेच पांढ-या शुभ्र हिमनद्या आता काळवंडलेल्या आणि काळ्या रंगाच्या दिसून पडतात.
२००६ मध्ये पहील्यांदा लद्दाखच्या शियांग गावात महापूर आला.मी त्यावेळी ८० वर्षांच्या सर्वात अनुभवी व्यक्तीला याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी देखील त्यांच्या हयातीत असा महापूर निदान लद्दाखमध्ये या पूर्वी कधीही बघितला नव्हता!याचा अर्थ ही देण जागतिक तापमान वाढीची होती ज्यामुळे हिमनद्या वितळून लद्दाखमध्ये महापूर आला.या महापूरात या गावाची संपूर्ण शेती व पशुधन यांचे अपरिमित हानि झाली.सुदैवाने जिवित हानी झाली नाही.यानंतर २०१० मध्ये लेह शहरात महापूर आला,यात एक चर्तुतांश शहर वाहून गेले.यानंतर २०१३,२०१७ मध्ये येणा-या महापूरांची तीव्रता ही वाढत जाणारी होती!त्या अनुभवी ८० वर्षांच्या गृहस्थाच्या काळात जागतिक तापमानाचे संकट नसल्यानेच त्यांनी कधीही अशी आपदा बघितली नव्हती.
यामुळेच जगातील प्रत्येक माणसाने आपल्या जीवनशैलीला समजून घेणे गरजेचे आहे.विजेचे प्रकल्प,प्रचंड प्रमाणात निर्माण होणारे जलविद्यूत बांध,वनांची बेसुमार कत्तल,क्रांक्रिटचे उभारले जाणारे शहरो-शहरी जंगल,हे सर्व सरकार स्वत:साठी निर्माण करीत नाही तर ती जनतेच्या सोयीसाठी करीत असते.सरकार हे ‘अलाउद्दीनचा जिन्न आहे आणि लोकं हे अलाउद्दीन आहेत’जिन्न फक्त आपल्या आकाचे ऐकत असतो.जनतेलाच जर गरजेपेक्षा जास्त सुख सोयी हव्या नसतील तर सरकार ते का निर्माण करेल?असा सरळ प्रश्न वांगचूक विचारतात.
सरकारला दुषणे देण्यापेक्षा स्वत:ला दुषणे द्या ज्यांनी स्वत:च्या गरजा प्रचंड प्रमाणात वाढवून घेतल्या आहेत,असे वांगचूक म्हणतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली होती,त्या निर्णयाचे देशभरातील पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले मात्र,या प्लास्टिकची निर्मिती करणारे उद्योगपती हे जास्त पॉवरफूल राहीले त्यामुळे मोदी यांना अवघ्या तीनच महिन्यात ही घोषणा मागे घ्यावी लागली!जनतेला कळले देखील नाही,ही घोषणा त्यांनी कधी मागे घेतली.या निर्णयाला आपणच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.जनतेचा आवाज हा ‘खामोश’होता व प्लास्टिक उद्योगपतींचा आवाज हा खूप जास्त होता!परिणाम,कोणाला भोगावा लागून द्यावा लागणार आहे?असा सवाल ते करतात.स्वत:ला बदलूनही जर आनंद मिळत नसेल तर इतरांसोबत जुळा,असा सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी त्यांनी लद्दाखमधील ९० च्या दशकात उघडलेल्या आगळ्या-वेगळ्या शाळेचे वैशिष्ठ उलगडून दाखवले.(आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’या चित्रपटात याच शाळेचे चित्रिकरण झाले आहे)ही शाळा फक्त नापासांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.शैक्षणिक क्षेत्रात नापास झाले त्यांनी या शाळेत अनेक प्रयोग यशस्वी करुन दाखवले.ही शाळा मातीने बनली असून,सोलारद्वारे या शाळेचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.इतकंच नव्हे तर या ठिकाणच्या गो-शाळांमध्ये देखील सोलार लावल्यानंतर अडीच पट जास्त दूध गाई देऊ लागल्या कारण उणे ३५ अंश तापमान असलेल्या गोठ्यात राहील्यामुळे गाईंची सर्व उर्जा स्वत:चे तापमान नियंत्रित ठेवण्या मागे खर्ची पडत होती.सोलारमुळे गोठ्यातील तापमान नियंत्रित झाल्यामुळे निसर्गत: गाईंची उर्जा वाचली व त्याचा परिणाम वाढीव दूधावर झाला,असे वागंचूक यांनी सांगितले.
लद्दाखमधील सीमेवर आपले सैनिक हे उणे ३५ अंश असलेल्या तापमानात सतत कर्तव्य बजावतात.हेच सोलारचे संयत्र वापरुन त्यांच्यासाठी देखील मातीच्या इमारती निर्माण करीत असल्याचे वांगचूक यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.त्यांनी केलेले उणे तापमानातील आंदोलन,पदयात्रा,याविषयी विचारले असता आम्ही केंद्र सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत,३ डिसेंबर रोजी त्यापैकी एक मागणी युवांना रोजगार,हे त्यांनी मान्य केले आहे मात्र,सहाव्या परिष्ठिामध्ये लद्दाखचा समावेश व स्थानिक स्तरावर स्वायत्तेची मागणी यावर येत्या ४ दिवसांनंतर १५ जानेवरी रोजी केंद्र सरकारसोबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.लद्दाखचा समावेश सहाव्या परिशिष्ठिामध्ये करणे व स्थानिक स्वायत्ता देणे हे दोन्ही लोकशाहीशी जुळलेले मुद्दे असल्याचे ते सांगतात.तुमचे निर्णय विधी मंडळात आमदार घेतात.ते तुम्ही निवडून पाठवलेले असतात,मग आमचे राज्य केंद्र शासित का?स्थानिक स्तरावर राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी फक्त लद्दाखच नव्हे तर देशातील प्रत्येक जिल्ह्या हा सहाव्या परिष्ठिामध्ये समाविष्ठ असावा,आपल्या जिल्ह्यासाठी आपला स्थानिक प्रतिनिधी असावा ना की आमदार असावा,असे मत त्यांनी व्यक्त केले.
चीन हा तिब्बेतमध्ये ब्रम्हपूत्र नदीवर प्रचंड मोठे धरणे बांधत असल्याकडे लक्ष वेधले असता,असे बांध चीन बांधो किवा भारत,धोका तर निर्माण होणारच असे ते म्हणाले.आपण पण पाकिस्तानसोबत इंडस वाॅटर संधी केली आहे.आपण पाकिस्तान देशाची पाण्याची गरज लक्षात घेतली तशीच चीनने देखील भारताची गरज लक्षात घ्यायला हवी.आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये ‘उच्च प्रतिची सभ्यता’पाळली पाहिजे.चीनने फक्त स्वत:चा विचार करुन आगळे पाऊल उचलल्यास भारताला संयुक्त राष्ट्र संघाकडे दाद मागावी लागेल किवा स्वत:च्या हिंमतीवर, स्वत:च्या स्तरावर चीनसोबत भांडावे लागेल.परंतू,दूर्देवाने भारताची उर्जा ही अंतर्गत भांडणात खर्च होत असल्याची खंत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.चीन ऐकणार नसेल तर आपण शक्तीशाली होणे क्रमप्राप्त आहे.
नागपूरात जनतेचा प्रकल्पांना विरोध नाही मात्र,प्रकल्पांसोबत शुद्ध प्राणवायू ही देखील नागपूरकरांची मागणी आहे परंतू,आधी विकासाचे स्वप्न दाखवले जातात व त्यासाठी पर्यावरणाचा अतोनात -हास केला जात आहे,यातून कसा मार्ग काढायचा?असा सवाल केला असता,माणसाला पैसे कमावण्याचा लोभ असतो मात्र,एक वेळ अशी येते की किती ही पैसे कमावले तरी त्याला आनंद मिळत नाही,याचाच अर्थ ‘अलाउद्दीन पहले खूद समजे उसे पाना क्या है?असा टोला त्यांनी हाणला.सिमेंट-कॉक्रीटचा उपयोग शहरातील रस्त्यां ऐवजी फक्त उड्डाण पूलांसाठी करता येईल.जगातील ३० टक्के लोकसंख्या आजही मातीच्या घरात आनंदात रहात आहे तर भारतातील ५० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात मातीच्याच घरात राहते.मातीच्या घरात राहण्याचे फायदे शिकणारे ‘शून्य’ टक्के आहेत! अतोनात उड्डाणपूले,जिथे तिथे भुयारी मार्ग,गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते,२८ मजली गगनचुंबी इमारती ज्या शहरात आहेत,खरे तर अश्या शहरात राहूच नये.पुढचा कोविड जेव्हा कधी येईल,अशा शहरात सर्वात आधी अर्ध्या- अधिक लोकसंख्येचा घास घेईल,त्यामुळे जे चुकीचे आहे ते चुकीच्याच उपायांनी सुधारु शकत नाही,असे वांगचूक सांगतात.
संसदेत अनेक विधेयके हे पर्यावरणावर पारित होतात मात्र,जमीनीस्तरावर त्याची कुठेही अंमलबजावणी दिसत नाही,असा सवाल केला असता,ना मी वकील आहे ना राजकारणी पण,युवांची भूमिका ही पर्यावरण वाचवण्यासाठी खूप मोलाची असल्याचे ते म्हणाले.लोकप्रतिनिधींवर दडपण तेच आणू शकतात,नाही तर आजकाल शंभर रुपयात आपले मत विकणारे आहेतच,असा टोला त्यांनी हाणला.सरकारला बदलण्याचा सर्वात चांगला उपाय आहे स्वत:ला बदला,असा माेलाचा सल्ला त्यांनी दिला.
१३ हजार मेगावाटच्या वीज उत्पादनासाठी लद्दाखमधील पश्चिमा चरवाहांचे उच्चाटन केले जात आहे,यावर प्रश्न केला असता,हे पश्चिमा चरवाहा खरे पाहिले तर भारतासाठी एकप्रकारे सोने उत्पादित करीत आहे,सोन्याचा अर्थ जगात कुठेही नाही एवढे दर्जेदार ऊन कुठेही मिळत नाही.त्यांना तिथून हूसकावून लावण्यापेक्षा त्यांचेही आयुष्य खुशहाल करण्याचे काम भारत सरकारने केले पाहिजे. संकटांच्या घोड्यावर स्वार होऊनच आम्ही हिरो बनत असतो,आता १३ हजार मेगावाटसाठी जितके सोलार पॅनल लागतील आम्ही त्या पॅनलच्या खाली पश्चिमा चरवाहांच्या पशुंसाठी यूरोपियन गवत उगवणार असल्याचे वांगचूक यांनी सांगितले.
सर्वात शेवटी पर्यावरण संरक्षणासाठी सल्ला देताना,जे जागरुक आहे त्यांनी हिंमत ठेवावी,आवाज उचलावा,कोणताही बदल घडवण्यासाठी वेळ लागतो मात्र,हिंमत एकवटण्यासाठी वेळ लागत नाही,पर्यावरणाचे अतोनात नुकसान करणा-या मूर्खांच्या मूर्खतेपक्षा जागरुकांच्या मुकेपणाने पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे वांगचूक म्हणाले.
मानकापूर प्रकल्पात चारशेच्या वर झाडे वाचवण्यासाठी आज नागपूरातील पर्यावरणवाद्यांनी त्या ठिकाणी डबा पार्टी केली व निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला.वांगचूक यांनी देखील अचानक त्या ठिकाणी भेट देत,या झाडांमध्ये ही जीव असल्याचे सांगितले.इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याने जे ‘नाखूश’आहेत ते मूठभर आहेत व ही झाडे तोडून प्रकल्प उभे करणारे जे ‘खुश’आहेत ते शहरभर आहे,त्यामुळेच नाखूश असणा-यांची संख्या वाढवा,असा सल्ला त्यांनी दिला.