बूटी कन्या शाळा बेघर निवारा केंद्रात महिला निवाऱ्याची क्षमता वाढणार, मनपा आयुक्तांनी केली पाहणी

– बेघरांशी साधला संवाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग, समाजोपयोगी उपक्रम अंतर्गत सीताबर्डी येथे बूटी कन्या शाळेमध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये जास्तीत जास्त बेघर महिलांना निवारा मिळावा यासाठी महिला निवाऱ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

शुक्रवारी (ता.१२) मनपा आयुक्तांनी सीताबर्डी मार्केट लगतच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आचंल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या. दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागपूर मनपा समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांसाठी पाच निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहेत. यामध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र सीताबर्डी, सावली शहरी बेघर निवारा केंद्र भानखेडा, हंसापुरी, आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र समाज भवन, नवीन बिल्डींग, इंदोरा मठ मोहल्ला, जरीपटका, बोधित्सव शहरी बेघर निवारा केंद्र, इंदोरा मठ मोहल्ला, जरीपटका व आधार शहरी बेघर निवारा जुने सतरंजीपुरा, मारवाडी चौक यांचा समावेश आहे.

सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा येथील निवारा केंद्रात सध्या २५ महिला व २५ पुरुषांची सोय करण्यात आली आहे. तळमजल्यावर पुरुष तथा पहिल्या माळ्यावर महिलांसाठी सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी महिलांच्या निवाऱ्याची क्षमता वाढवून ती ५० पर्यंत करण्याचे निर्देश विभागाला दिले.

यावेळी पाहणी करताना आयुक्तांनी बेघर पुरुष आणि महिलांशी संवाद साधला. महिलांनी त्यांना सांगितले की, त्यांचाकडे राहण्याची कोणतीही सोय नाही म्हणून ते इथे राहत आहेत. कोणीही नातेवाईक ठेवायला तयार नसल्यामुळे निवारा केंद्रात आसरा घेतल्याचेही काही महिलांनी सांगितले. बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून बेघर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना काही त्रास असल्यास रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असल्याची माहिती निवारा केंद्राचे देवेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवलाई शहरस्तर संस्था सोनचिरिया उपजीविका केंद्राची सुध्दा पाहणी केली. पं. रविशंकर शुक्ला हायस्कूल, टेम्पल बाजार रोड येथे संस्थेच्या माध्यमातून बचत गटामार्फत तयार करण्यात येणारे पदार्थ व वस्तुंची विक्री केली जात आहे. आयुक्तांनी उपजीविका केंद्र संचालित करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.

याप्रसंगी शहर व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार व नूतन मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे लाखावर अर्ज प्राप्त,अर्ज नोंदवण्यास दिरंगाई खपवली जाणार नाही – जिल्हाधिकारी संजय दैने

Sat Jul 13 , 2024
– जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करावी – सुधारित नमुन्यातील अर्ज सादर करावे – सहायता कक्षाची स्थापना गडचिरोली :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत एक लाख आठ हजार ४१५ महिलांनी अर्ज केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले यासोबतच सदर योजना शासनाची महत्वाकांक्षी योजना असून यात अर्ज नोंदविण्यासाठी दिरंगाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com