नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत गुरुवारी (ता३०) रोजी धरमपेठ झोन येथील फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र(UPHC) येथे आयोजित विशेष शिबिरा मध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “लाभार्थ्यांशी संवाद” कार्यक्रम ऐकला आणि विकसित भारतासाठी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला होता. मनपा द्वारा आयोजित नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, समाज विकास अधिकारी डॉ रंजना लाडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान, माजी नगरसेवक प्रमोद करौती यांच्यासह झोनल कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी उपस्थित नागरिकांना आणि लाभार्थ्यांना ‘ हमारा संकल्प विकसित भारत “ही शपथ” दिली.
विकसित भारत संकल्प यात्रेला आज 15 दिवस पूर्ण होत असून आता यात्रेने वेग घेतला आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधीत करताना सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लाभार्थ्यांचा हिरीरीने सहभाग, उत्साह आणि संकल्पाचे कौतुक केले. तसेच सर्व लोककल्याणकारी योजना एका छताखाली उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.