– लोहमार्ग पोलिसांत गुन्ह्याची नोंद, पती पत्नी कारागृहात
नागपूर :-केंद्र शासनाच्या कार्यालयातील एका 35 वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. ती कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना पती-पत्नी आले आणि तिच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सारेच कर्मचारी गोंधळले. काही सहकार्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याच्या प्रयत्न केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपी पती-पत्नी विरुद्ध गुन्हा नोंदविला. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकारामुळे कार्यालयात चर्चेला उधाण आले आहे.
पीडित आणि आरोपी एकाच कार्यालयात आणि एकाच पदावर कार्यरत आहेत. पीडिता मूळची उत्तरप्रदेशातील आहे. नोकरी निमित्त कुटुंब सोडून ती नागपुरात राहते. समान जबाबदारी असल्याने पीडित आणि आरोपी यांच्यात चांगली ओळख होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या प्रकरणाची कुणकुण आरोपीच्या पत्नीला लागली. याच विषयावरून त्यांच्या घरी भांडण व्हायचे.
दरम्यान नाहक बदनामी होत असल्याने पीडितानेही त्याला अनेकदा दूर राहण्यास बजावून सांगितले. मात्र, तो काही केल्या ऐकायला तयार नव्हता. वारंवार मोबाईलवर फोन करणे, व्हॉट्स अॅप करणे या प्रकारामुळे पीडिता त्रस्त झाली होती. सततच्या त्रासाला कंटाळून तिने विभागप्रमुखाकडे तक्रार अर्ज केला. आरोपीच्या विरुद्ध तक्रार केल्याने आता कार्यालयीन कारवाईला समोर जावे लागेल, या भीतीपोटी आरोपीने तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मात्र, ती त्याच्या दबावाला बळी पडली नाही.
दरम्यान गुरूवार 30 मार्च रोजी ती कार्यालयात संगणकावर काम करीत असताना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आरोपी पती पत्नी आले. तक्रार मागे घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीपर्यंत पोहोचले. सहकारी कर्मचार्यांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले. पीडित महिलेने लोहमार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना घटनाक्रम सांगितला. पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून सहकारी कर्मचार्यांना विचारपूस केली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती पत्नी विरुद्ध धमकी, विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम 353, 354 (डी), 323, 506 (2), 504 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी पती-पत्नीला कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
तपास अधिकार्यांकडून प्रतिसाद नाही
या प्रकरणाची सत्यता आणि अधिक माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी सपोनि अश्विनी पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी सहकार्य केले.