– निजामुद्दीन-कन्याकुमारी एक्सप्रेसमधील घटना
नागपूर :-धावत्या रेल्वेत अचानक एका वर्षाच्या बाळाची तब्येत बिघडली. त्याला उलट्या व्हायला लागल्या. आई घाबरली काय करावे काही कळत नव्हते. ती मदतीची याचना करीत होती. त्याच वेळी नागपुरातील एका जागरुक प्रवाशाने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि नागपूर स्थानकावर गाडी येताच डॉक्टर उपस्थित झाले. औषधोपचाराने बाळ आणि बाळाची आई निश्चित होवून पुढील प्रवासाला निघाली.
गौतम यादव असे बाळाचे नाव आहे. एक वर्षाच्या बाळासह ती माता चेन्नईसाठी निघाली. 12642 निजामुद्दीन – कन्याकुमारी एक्सप्रेसच्या एस-4 बोगीतील 44 नंबरच्या बर्थवरून ती प्रवास करीत होती. वार्याच्या गतीने धडधड करीत गाडी नागपुरच्या दिशेने जात होती. ईटारसीनंतर अचानक बाळाची तब्येत बिघडली. बाळ सतत रडत होते. वारंवार उलट्या व्हायला लागल्याने बाळाची आई घाबरली. तिने मदतीची याचता केली. जवळच्या बर्थवरील प्रवासी तिकीट तपासणीसाला शोधायला निघाले.
दरम्यान तो ए-1 कोचमध्ये गेला आणि टीसी संदर्भात विचारपूस करू लागला. त्याच बोगीत नागपूरचे एक जागरुक प्रवासी होते. सूरज खापर्डे असे त्यांचे नाव आहे. प्रवाशांसी निगडीत समस्यांना ते नेहमीच वाचा फोडतात. त्यांनी विचारपूस केल्यावर एका वर्षाच्या बाळाची प्रकृती बिघडल्याचे प्रवाशाने सांगितले. खापर्डेने लगेच बाळाच्या आईकडून संपूर्ण माहिती घेतली आणि रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. नियंत्रण कक्षातील कर्मचारी प्रमोद वानखेडे यांनी संपूर्ण माहितीची नोंद करून लगेच डॉक्टरांना कळविले. काही वेळातच म्हणजे रात्री 10.20 वाजता गाडी फलाट क्रमांक 2 वर आली तत्पूर्वी डॉक्टर वैभव पाटील प्लॅटफार्मवर उपस्थित होते. त्यांनी बाळाची तपासणी करून औषधोपचार केला. बाळ व्यवस्थित असल्याची त्या मातेला खात्री दिली. आई निश्चित होताच पुढील प्रवासाला निघाली.