– अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे १३९४ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित !
– १८ कोटी रुपयांच्या संपूर्ण कामाची चौकशी करा रुपेश वाळके यांची मागणी !
मोर्शी :- मोर्शी वरुड तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकार करून मोर्शी वरुड तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून मोर्शी तालुक्यातील पाक नदी सिंचन प्रकल्पावरून १३९४ हेक्टर सिंचन केल्या जाणाऱ्या बंदिस्त पाईप लाईन कालव्याच्या कामाला जलद गतीने पूर्ण करून सोबतच मार्च २०२३ पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचन आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे व कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे दापोरी हिवरखेड, पाळा, मायवाडी, उमरखेड यासह लाभ क्षेत्रातील विवीध गावातील शेतकरी मागील ३ वर्षांपासून पाक प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराच्या उदासीन धोरणांमुळे हजारो शेतकरी सिंचानापसून वंचित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी पाक नदी लघु पाटबंधारे प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त नलिके द्वारे वितरण प्रणालीच्या कामाकरिता कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतुद करुन दिल्यामुळे उमरखेड, हिवरखेड दापोरी, मायवाडी, डोंगरयावली, मोळवन, बोपलवाडी, घोडदेव बु, घोडदेव खुर्द या परिसरातील १३९४ हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येणार होते. मात्र मागील 3 वर्षांपासून सिंचन क्षेत्राचे काम पुर्ण झाले नसून सदर कामाची चौकशी करून शेतकऱ्यांना सिंचनापसून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदार कार्यवाही करून पाक सिंचन प्रकल्पाचे बंदिस्त नालिकेचे काम तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी लाभ क्षेत्रातील शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन संपूर्ण कामांची पाहणी करून उर्वरित प्रलंबित सिंचन क्षेत्राची कामे तात्काळ पुर्ण करण्याची मागणी केली होती मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्येची दखल घेतली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात असून लाभ क्षेत्रातील उमरखेड, हिवरखेड दापोरी, मायवाडी, डोंगरयावली, मोळवन, बोपलवाडी, घोडदेव बु, घोडदेव खुर्द येथील शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढून त्यांना दिलासा देण्याची विनंती केली आहे.
मोर्शी वरूड तालुका हा ड्राय झोन मध्ये असून सुद्धा मागील १० वर्षाच्या कालावधीत सिंचन प्रकल्पांची कामे पूर्णपणे ठप्प होती. २०१९ नंतर या सिंचन प्रकल्पांच्या कामांना पुन्हा गती मिळाली असून पाक सिंचन प्रकल्पाच्या बंदीस्त नलिकेचे कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचविण्यासाठी १८ कोटी १ लक्ष ७३ हजार रुपयांची तरतुद करण्यात आल्यामुळे पाक सिंचन प्रकल्पावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करून ३१ मे २०२४ पर्यंत बंदिस्त नलिकेद्वारे उमरखेड, हिवरखेड दापोरी, मायवाडी, डोंगरयावली, मोळवन,बोपलवाडी, घोडदेव बु, घोडदेव खुर्द या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना बांधावर पाणी न मिळाल्यास संपूर्ण कामांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कार्यवाही न झाल्यास हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिला आहे.