– आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेच्या ताफ्यात आणखी १० बसेसचा समावेश झाला आहे. बुधवार (ता.२१) रोजी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी या बसेसचे लोकार्पण केले. तसेच बसमध्ये बसून प्रवासाचा आनंद देखील घेतला.
या प्रसंगी मनपाचे मुख्या अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त सुरेश बगळे, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, कायर्कारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, परिवहण विभागाचे रवींद्र पागे, योगेश लुंगे, विनय भारद्वाज, अरुण पिंपूरडे, समीर परमार पीएमआयचे संचालक नागा सत्यम, सूर्यकांत अंबाळकर, सचिन गाडबेल, हंसा मोटर्सचे आदित्य छाजेड, मन यादव यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकार्पण प्रसंगी मार्गदर्शन करताना आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनात आपली बसचे चांगले महत्व आहे. शहरातील जवळपास दीड लाख लोक आपली बसद्वारे प्रवास करतात. नागरिकांचा प्रवास सुखद, सुरक्षित आणि आल्हाददायी व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित ई- बसेसचा परिवहन विभागात समावेश करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून व नागपूर महानगपालिकेच्या पर्यावरण विभाग यांच्या माध्यमातून नागपूर महानरपालिकेच्या परिवहन विभागाला १० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शहरातील एकूण ई-बसेस ची संख्या आता ९६ इतकी झाली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे ४६ नॉन एसी ई-बस आणि ४० एसी(वातानुकूलित) बसेस होत्या. 40 ए.सी. बसेस नागपूर स्मार्ट सिटी कडून प्राप्त झाल्या आहेत. तसेच आज पीएमआय कंपनीकडून प्राप्त झालेल्या १० बसेस मुळे ही संख्या एकूण ९६ इतकी झाली आहे. पुढील काळात 134 ई-बसेस मनपाला प्राप्त होणार आहे.
पीएमआय कंपनीकडून प्राप्त झालेल्या या बसेस अत्याधुनिक स्वरूपाच्या असून, २६ अधिक १ अशी या बसेसची आसन संख्या असणार आहे. लवकरच या बसेस नागपूर शहराच्या विविध भागात आपली सेवा देणार आहे.
दिव्यांगांसाठी विशेष सोय
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वातानुकूलित बसेस मध्ये दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांना बसमध्ये चढण्यास मदत व्हावी याकरिता बसच्या दारात जवळ दिव्यांगांसाठी एक आधुनिक पट्टी लावण्यात आला आहे. बसचे दार बंद झाल्यावर ही पट्टी देखील बंद होतात आणि दार उघडल्यावर पट्टी उघडते. त्यामुळे दिव्यांग बांधवाना चढ- उतार करण्यास मदत होईल.