– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ‘संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी’चे उद्घाटन
ठाणे :- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा आणि स्वच्छता ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून, या क्षेत्रात २०२४ सालात ३,५०,००० हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. २०२३ च्या तुलनेत ही वाढ १५ ते २० टक्के जास्त असेल.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. सदर अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून, नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश करण्यात आला आहे. येथे मॅकेनाईज्ड हाऊसकिपींग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
या अकॅडमीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
१. सुविधा व्यस्थापनातील आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी लघु आणि दीर्घ कालावधीचे शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध
२. सुविधा क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक व्यवहारिक ज्ञान देण्यावर भर
३. उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सोयी आणि उपकरणांनी सज्ज
४. सर्वांगीण व्यस्थापनासाठी भारत विकास ग्रुपचे सहकार्य