थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपत असून सदर योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील 65,445 वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 86 कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना 44 कोटी 35 लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे. नागपूर परिमंडळातील 7592 वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर परिमंडळ (6101 ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (5893 ग्राहक) ही परिमंडळे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विभागांमध्ये नागपूर विभाग 20,400 लाभार्थी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्या नंतर कोकण विभाग (17,798), पुणे विभाग (17,448) व छत्रपती संभाजीनगर (9,818) यांचा क्रम लागतो.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रांचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे.

असा लाभ घ्या

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर येथे 'शिवबा ते छत्रपती' 'जीवन गाथा शिवरायांची' संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे

Sat Nov 30 , 2024
नागपूर :- 29 नोव्हेंबर रोजी रवीनगर येथे प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘शिवबा ते छत्रपती’ ‘जीवनगाथा शिवरायांची ‘या संकल्पनेवर आधारित या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, जोश आणि शिस्तबद्धतेने साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाने शाळेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यांची आणि त्यागाची प्रभावी आठवण उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!