दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ, आजाराग्रस्तांना सवलतीचा प्रवास, परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांना सादर

नागपूर :- दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित आजारग्रस्त आदींना नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सवलत कायम ठेवित इतर प्रवाशांच्या भाड्यामध्ये देखीले कुठलीही वाढ न करणारा परिवहन विभागाचा सर्वसमावेशी अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सादर केला.

नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२३-२४ चा सुधारित व २०२४-२५ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मनपा प्रशासक आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सोपविला. यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, श्रम अधिकारी अरुण पिपरूडे, सहायक लेखापाल समीर परमार, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, कनिष्ठ लिपीक अंकीत चौधरी उपस्थित होते.

२०२४-२५ च्या वार्षिक अर्थसंकल्प ‘ब’ चे उत्पन्न रु. ५१७.४१ कोटी अपेक्षित असुन सुरूवातीची रु. ३०.४८ लक्ष शिल्लकेसह एकूण उत्पन्न रु. ५१७.७२ कोटी अपेक्षित उत्पन्न गृहित धरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रु. ५१७.३४ कोटी रुपये खर्च होईल. मार्च २०२५ अखेर अपेक्षित शिल्लक रु. ३८.३८ लक्ष एवढी राहिल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी दिली.

विभागाद्वारे पर्यावरणपूरक परिवहन सेवेवर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. मनपाच्या परिवहन सेवेमध्ये सध्या १०८ इलेक्ट्रिक बसेस, ४५ मिनी बसेस, १५० मिडी बसेस व डिझेल आणि सीएनजी वरील २३७ स्टॅडर्ड बसेस अशा एकूण ५४० बसेसचा समावेश आहे. शहरात सध्यस्थितीत ११५००० दैनंदिन प्रवाशी संख्या असून बसेसच्या ५२३२ दैनिक फे-या होत आहेत. उन, वारा, पाउस अशा नैसर्गिक परिस्थितीत प्रवाशांच्या संरक्षणासाठी शहरात अद्ययावत सुविधेचे २३९ बस थांबे ‘बीओटी’ तत्वावर मे.साईन पोस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीकडून उभारण्यात आलेले आहेत. यातून विभागाला प्रतिबस १४६०० रुपये निधी रॉयल्टी स्वरूपात उत्पन्न होणार आहे, असेही भेलावे यांनी सांगितले.

केंद्र शासनाचे ‘फेम II’ अंतर्गत मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि. यांचेशी झालेल्या करारनाम्यानुसार, इलेक्ट्रीक मिडी बसेस ऑगस्ट २०२२ पासून शहर बस संचालनात कार्यरत आहेत. या इलेक्ट्रीक मिडी बसेसच्या पार्किंग व चार्जिंग स्टेशन करीता मनपाच्या मालकीच्या वाडी डेपो येथील अंदाजे ३ एकर जागा हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कडून शहर बस संचालनाकरीता एकूण ४० इलेक्ट्रीक एसी मिडी बसेस खरेदी करुन पुरवठा करण्यात आलेल्या आहेत. ऑरेंज स्ट्रीट डेपो येथील जागा या बसेसच्या पार्किंग करीता देण्यात आलेली असून बसेसच्या इलेक्ट्रीक चार्जिंग करीता १५ डिसी चार्जिंगची यंत्रणा प्रस्थापित करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुचनेवरुन ‘आय-रास्ते’ या संस्थेच्या माध्यमातून मनपाच्या ५० बसेसवर कॅमेरे लावून व चालकांना प्रशिक्षण देउन अपघातरहीत परिवहन सेवा निर्मीतीवर भर दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मनपाला यांनी २५० स्टॅण्डर्ड वातानुकुलीत विद्युत बसेस खरेदी करण्यास रु ५५ लक्ष प्रति बस प्रमाणे एकूण १३७ कोटी रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. या प्राप्त निधीतून २५० स्टॅण्डर्ड वातानुकुलीत विद्युत बसेस खरेदीची प्रक्रिया सुरु असुन येत्या आर्थिक वर्षात या बसेसचा समावेश परिवहन विभागाच्या ताफ्यात होईल, अशी अपेक्षा परिहवन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी व्यक्त केली.

शहर बस ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी करुन पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचा समावेश शहर बस सेवेत करण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी १५व्या वित्त आयोगाच्या २०२५ पर्यंत प्राप्त होणाऱ्या निधीतुन परिवहन सेवेच्या बळकटीकरणाकरीता वातानुकुलित १४४ बसेस वेटलिजवर खरेदी करण्याकरीता निधी उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत ५७ एसी इलेक्ट्रीक मिडी बसेस प्राप्त झाल्या असून त्यातील २२ बसेसचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासकांच्या हस्ते करण्यात आले असून त्या बसेस सेवेत कार्यरत आहेत. या सर्व बसेसमध्ये दिव्यांगाचा बस प्रवास सुखकर व्हावा याकरिता दिव्यांग प्रवाशांना पूरक ठरतील अशी चढ-उतार आणि आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागपूर शहराकरीता मा. पंतप्रधान ई-बसेस योजनेंतर्गत १५० ई मिडी बसेस मंजूर झालेल्या असून या १५० ई मिडी एसी बसेसपैकी ७५ बसेस कोराडी डेपो व उर्वरित ७५ बसेस खापरी डेपो येथील वाहन तळावरुन संचालित करण्याच्या मनपाच्या परिवहन विभागाचा मानस असल्याचे परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले. विशेष म्हणजे या करीता केंद्र शासनाने ३३ केव्ही ई.व्ही. चार्जिंग सुविधा उभारण्याकरीता कोराडी डेपो करीता २१.२१ कोटी व खापरी डेपो करीता ३.५९ कोटीचा निधी सुध्दा उपलब्ध करुन दिलेला आहे. बांधकामाकरीता कोराडी डेपोसाठी ३ कोटी २६ लक्ष व खापरी डेपोसाठी १४ कोटी ५७ लक्ष ची तरतूद करण्यात आली असुन यापैकी ६० टक्के निधी शासनातर्फे उपलब्ध होणार असून ४० टक्के निधीचा खर्च मनपाला करावा लागणार आहे.

नागपूर महानगरपालिकेची दैनंदिन बस सेवा अविरतपणे कार्यरत रहावी म्हणून नवीन आय.बी.टी.एम. ऑपरेटर ची निवड प्रक्रिया अंतीम टप्यात असून नियुक्ती नंतर तंत्रज्ञानाचा वापर तिकीट चोरी सारख्या गैरमार्गाला आळा घालण्यासाठी व कॅशलेस व्यवहारास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच उत्पन्न वाढीसाठी केले जाईल. बस आगाराअंतर्गत रस्ते व परिसरातील विकास या मुलभूत सोयी सुविधांची कामे या लेखाशिर्षांतगत केंद्र शासनामार्फत इलेक्ट्रीक बस डेपो निर्मिती करीता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ४२ कोटी ६३ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. नागपूर शहरात बस थांबा फलक (निर्देशक फलक) उभारणी करीता सन २०२४-२५ आर्थिक वर्षाकरीता १ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली असल्याचे देखील यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी - अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे निर्देश

Tue Feb 27 , 2024
मुंबई :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com