मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री सभागृहात उपस्थित रहात नसल्याने अजित पवारांनी सरकारला चांगलेच खडसावले…
मुंबई :- सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला.
आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना रात्री अडीच – तीन वाजेपर्यंत काम करण्याची सवय आहे. त्यामुळे सकाळी अडचण होते हे आम्ही समजू शकतो, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. परंतु चंद्रकांत पाटील अडीच – तीन वाजेपर्यंत जागत नाहीत… त्यांनी लवकर उठून आले पाहिजे. शिवाय संबधित जे मंत्री आहेत त्यांनी लवकर आले पाहिजे.. संसदीय कामकाज मंत्री असं काय काम करतात असा सवाल करतानाच संसदीय कामकाज मंत्री यांना जमत नसेल (मला त्यांना कमी लेखायचे नाही) मग त्यांनी थांबू नये अशा स्पष्ट इशाराच अजित पवार यांनी यावेळी दिला.
अर्थसंकल्प अधिवेशन किती महत्त्वाचे असते हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आपण अध्यक्ष झाल्यानंतर चांगल्या प्रथा पाडण्याचा प्रयत्न करताय, शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय, आम्ही विरोधी पक्षाच्यावतीने सहकार्य करत आहोत. अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना रात्री दहा वाजेपर्यंत कामकाज घ्या अशी विनंती केली त्याला मान्यता दिली. परंतु रात्री एक वाजेपर्यंत कामकाज चालले. त्या चर्चेला मंत्री हजर नव्हते याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. ज्यांना बाहेर जायचे आहे, एखादा मंत्री बाहेर गेला तर कामकाज थांबवावे लागते, तरीही आम्ही समजून घेतले. मंत्री वॉशरुमला, चहा प्यायला गेले असतील. आम्ही जेव्हा सभागृहात असायचो त्यावेळी सकाळी नऊ वाजता हजर असायचो. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून फुशारकी सांगत नाही असेही अजित पवार म्हणाले.
गेली ३०-३२ वर्ष या सभागृहाची परंपरा कशी चालत आली आहे. आपण कशी राखली पाहिजे व नंतरच्या लोकांनीही राखली पाहिजे. या विधीमंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो. आज सकाळी साडे नऊला कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जास्त व्याप असतो याची जाणीव आहे. परंतु ते नसले तरी संसदीय कार्यमंत्री तरी किमान साडे नऊला येऊन बसले पाहिजेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर आमचा आरोप नाही परंतु त्यांनी जबाबदारी घेतली तर येऊन बसा ना बाबा अशा शब्दात अजित पवार यांनी खडसावले.
आज सभागृहात मंगलप्रभात लोढा यांची एक लक्षवेधी झाली सहा मंत्री गैरहजर… अध्यक्ष महोदय यांना ‘जनाची नाही मनाची तरी वाटत नाही का?’ … मला वाईट वाटते असे शब्द वापरायला असेही अजित पवार म्हणाले.
एक दीड वाजेपर्यंत सदस्य बसले आणि सकाळी साडे नऊला दोन्ही बाजूचे सदस्य लक्षवेधी होते ते आले. आणि मंत्रीच नाहीत. असे काय काम मंत्र्यांना आहे असा संतप्त सवाल अजित पवार यांनी करतानाच अहो तुम्हाला मंत्री करत असताना मागे – मागे पळत असता… मी बोलत नाही सकाळी कालिदास कोळंबकर यांनी तुम्ही मंत्री होण्यासाठी आणि मंत्री करा सांगण्यासाठी पुढे- पुढे जाता असे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
मंत्री झाल्यावर सभागृहाची जी परंपरा आहे, जी कामे आहेत ती तुमच्यावर वैधानिक काम दिले आहे. अध्यक्ष महोदय तुम्हालाही ती गोष्ट आवडली नाही असे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितले. देवेंद्र आम्ही तुम्हाला सिन्सियर म्हणून बघतो तुम्ही त्याठिकाणी उच्चविद्याविभुषित अशी तुम्हाला नावे दिली आहेत. पण तुमचेही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या काही मंत्र्यांना सांगा अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
यापूर्वीचे संसदीय कामकाज मंत्री संपर्क साधायचे. ही पध्दत होती परंतु हे जे काही चाललंय ते योग्य नाही. आज आठ लक्षवेधी होत्या त्यात सात लक्षवेधी सभागृहात मंत्री नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.