सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा! – भंडारा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा

भंडारा :- संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका,70 वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी, समृद्ध, संपन्न भारत हा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड सभेत बोलताना केले. मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात एक कोटी महिलांचे आयुष्य लखपती दीदी योजनेतून उजळले, नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतील, तेव्हा देशातील तीन कोटी महिला लखपती दीदी बनतील हा मोदी सरकारचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते .

भाषणाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करताना शाह यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करणारी काँग्रेस आज बाबासाहेबांच्या नावाने मते मागत घराघरात फिरत आहे. पण याच काँग्रेसने पाच दशके सत्तेवर असूनही बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही,त्यांचा सातत्याने अपमान केला. भाजपा सरकारने बाबासाहेबांशी संबंधित असलेल्या पाचही ठिकाणांना पावित्र्य देऊन बाबासाहेबांना युगानुयुगांचे अमरत्व दिले आहे, असे ते म्हणाले. भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण संपुष्टात आणणार असा संभ्रम जनतेमध्ये काँग्रेसकडून पसरविला जात आहे, आमच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटविण्यासाठी केला नाही, पण कलम 370, तिहेरी तलाक हटविण्यासाठी निश्चितच केला. जोपर्यंत भाजपा सत्तेवर आहे, तोवर आरक्षण रद्द करणार नाही आणि रद्द करू दिले जाणार नाही ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे, असे शाह म्हणाले.

गेल्या दहा वर्षात मोदीनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. 70 वर्षात काँग्रेसने कलम 370 ला अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून ठेवले, 5 ऑगस्ट 2019 ला मोदीजींनी हे कलम हटवून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत ठेवला. मोदीजींनी राम मंदिराचा संकल्प पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर बाबा विश्वनाथ कॉरिडॉर,बद्रीनाथ केदारनाथची नूतन नगरी, सोमनाथ मंदिराला सोन्याची झळाळी, गुजरातेतील शक्तिपीठाची 400 वर्षांनंतर पुनर्स्थापना करून नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचा प्रत्येक सांस्कृतिक मानबिंदू पुनरुज्जीवित केला. मोदीजींनी देशाला समृद्ध केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

काँग्रेसच्या सत्ताकाळात पाकिस्तानातून दहशतवादी येत होते, बाँबस्फोट करून आरामात निघून जात होते मात्र काँग्रेस काहीच करत नव्हती. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, देशातील अनेक राज्यांतील नक्षलवादाचे थैमान मोदींनी संपविले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, तीन वर्षांत छत्तीसगडमधूनही नक्षलवाद नष्ट करतील, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राहुल गांधी कधीच वाचन करत नाहीत. आता पुन्हा ते गरीबी हटविण्याची घोषणा करत आहेत. हीच घोषणा इंदिराजींनी केली, त्या गेल्या, राजीव गांधी गेले, सोनियानी काहीही केले नाही, पण नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत देशातील 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले, 80 कोटी लोकांना पाच वर्षे मोफत धान्य देऊन त्यांचे जीवन सुरक्षित केले, पुढच्या पाच वर्षांकरितादेखील 12 कोटीहून अधिक घरांत शौचालये, 4 कोटी गरीबांना घरे दिली. आणखी 3 कोटी गरीबांना घरे देण्याची घोषणा आजच मोदींनी केली. 14 कोटी गरीबांना नळाद्वारे पाणी, घराघरांत पाईपद्वारे गॅस जोडण्या देण्याचा मोदी यांचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

2014 मध्ये राहुल गांधींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी 22 हजार कोटी राखून ठेवले होते. 2022-23 मध्ये मोदीजींनी एक लाख 25 हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली. भंडारा-गोंदिया क्षेत्रात धान खरेदी दुप्पट झाली आहे. समृद्धी महामार्ग, गावागावांना जोडणारे पक्के रस्ते, गरीबांसाठी एक लाख घरे, सात लाख आयुष्मान भारत लाभार्थी, दोन लाख 10 हजार महिलांसाठी उज्ज्वला गॅस जोडण्या, 2.40 लाख घरांत नळ जोडण्या देण्याचे काम मोदी सरकारने केले. सोनिया- मनमोहन सरकार मध्ये मंत्री असलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला. दहा वर्षे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा 1 लाख 91 हजार कोटी राज्याला दिले, मात्र, दहा वर्षांत 7.15 हजार कोटी रुपये मोदी सरकारने दिले, असे सांगत त्यांनी राज्याच्या विकासाकरिता मोदी सरकारने दिलेल्या योगदानाची यादीच जाहीर केली.

उद्धव ठाकरे, शरद पवार पक्ष फोडल्याबद्दल भाजपा ला दूषणे देतात. हे काम आम्ही नाही, तर उद्धवच्या पुत्राने, पवारांच्या कन्येने केले. आज अर्धी शिवसेना, अर्धी एनसीपी आणि त्यांनी बनविलेली अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी केला. राज्याचे हित केवळ मोदी सरकारच करू शकते, अशी ग्वाही देऊन ते म्हणाले की, काँग्रेसने खोदून ठेवलेला खड्डा भरण्यात मोदी सरकारची दहा वर्षे गेली, पुढच्या पाच वर्षांत महान भारताच्या निर्मितीचे काम सुरू होणार असून विकासाला वाहून घेतलेले घेतलेले मोदी सरकार 2047 मध्ये महान भारताची निर्मिती करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एका बाजूला राहुल गांधींची परिवारवादी पार्टी, तर दुसरीकडे गरीबाघरी जन्मलेला, 23 वर्षात एकही सुट्टी न घेता देशाची सेवा करणारे मोदी, एकीकडे भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष, तर दुसरीकडे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, असा चारित्र्यवान, प्रामाणिक मोदी नावाचा नेता आहे. आता तुम्ही निर्णय करा, आणि मेंढे यांना दिलेले प्रत्येक मत, देशाला सुरक्षित बनविणारे, भारताला तिसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविणारे ठरेल, म्हणून मेंढे यांना बहुमताने विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करा, असे आवाहन अखेरीस शाह यांनी केले.

मोदी सरकार हे परिवर्तनाचे पर्व-उपमुख्यमंत्री फडणवीस

शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, महिला, युवक आणि समाजाच्या प्रत्येक घटकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाने केले आहे. राहुल गांधींच्या पक्षाने साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण ओबीसी समाजासाठी त्यांनी काय केले, मोदींनी गेल्या दहा वर्षांत जे काम केले, ते राहुल गांधींच्या पक्षाने साठ वर्षात केले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली - ना. सुधीर मुनगंटीवार

Mon Apr 15 , 2024
– बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिली मानवंदना चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमते विरोधात लढा दिला. समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com