मुंबई :- वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही एका महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अमित झनक यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, एमआयडीसीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रात हे उद्योजकांना कमीत कमी दरात भूखंड उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी, वाशिम यांनी ही जमिन कमीत कमी दराने अथवा कृषीदरानुसार उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून फेरमूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित ठिकाणी औद्योगित क्षेत्र स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित व विकसनशील भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार उपलब्ध व्हावे या उद्देशाने सामूहिक प्रोत्साहन योजना राबविली जाते. योजनेंतर्गत पात्र उद्योगांना औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, विद्युत शुल्क माफी, व्याज अनुदान, मुद्रांक शुल्क सवलत व विद्युत कर अनुदान अशी प्रोत्साहने अनुज्ञेय आहेत. वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून वर्गीकृत केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहने देय आहेत. त्याप्रमाणे 14 कोटीची प्रोत्साहने वितरित झाली असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारला.