ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर :- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठीचे निर्णय घेतले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ देऊन प्रगतीच्या महामार्गावर आपल्या राज्याला नेऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केले.

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपशीलवार उत्तर दिले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात गेल्या सहा महिन्यात राज्यातील विविध घटकांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. विदर्भ विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, युवक, महिला, शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

नागपुरात झालेल्या या अधिवेशनात विदर्भासह राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका आम्ही मांडली. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत ही राज्य शासनाची भूमिका आहे. याच भूमिकेतून या भागातील प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहोत. राज्य शासनाच्या कामाचा वेग जनतेने पाहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी कालावधीत नागरिकांच्या हिताचे सर्वाधिक निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना चौकटीबाहेर जाऊन बाहेर मदत केली. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना 755 कोटी रुपयांची मदत केली. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत आपण केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत देण्यात आली. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रती हेक्टरी बोनस जाहीर केला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 75 हजार जणांना नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याशिवाय दोन हजार अधिसंख्य पदे भरण्यात येणार आहेत. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून लाखो युवकांना संधी मिळणार आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी सुरजागड प्रकल्पात खनिजाच्या उत्खननाबरोबरच खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प करीत आहोत, यामुळे गडचिरोलीची ओळख बदलणार आहे. हजारो हातांना काम मिळणार आहे. राज्य शासनाने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले, त्यातील 44 हजार कोटींचे प्रकल्प एकट्या विदर्भातीलच आहेत, त्यामध्ये 45 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण विविध निर्णय घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचे उघडकीचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांनी स्थानिक गुन्ह्यांमध्ये पुढाकार घेऊन कारवाई केल्याने ही वाढ झाली आहे. राज्यात आता 18 हजार पोलीस भरती देखील सुरु केली आहे. दोषसिद्धीचे प्रमाण 60 टक्के इतके झाले आहे. गतवर्षीशी तुलना केली असता दोषसिद्धीचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ऑपरेशन मुस्कान मध्ये राज्यात 2015-22 कालावधीत मिसींग रेकॅार्डवरील 37 हजार 511 लहान मुले, मुली यांना पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महापुरुषांच्या अवमानासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करता येईल का किंवा सध्याच्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती अथवा सुधारणा करता येतील का यासाठी विधिमंडळातील सन्माननीय सदस्यांची समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील इतर महत्वाचे मुद्दे

· भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनविण्याच्या दृष्टीने लवकरच कार्यवाही. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

· शिवसृष्टीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

· पंढरपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास स्थानिकांना विश्वासात घेऊन करणार

· राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाच्या घेतलेल्या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटी नागरिकांनी घेतला.

· दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.

· जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय सुरु करण्यात येत आहेत.

· दिवाळीमध्ये नागरिकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचे काम. याशिवाय दिवाळी सह इतर सर्व सण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले.

· राज्यात सातशे ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याचा निर्णय. मुंबई मध्ये 50 दवाखाने सुरू केले. त्याठिकाणी 147 प्रकारच्या विविध तपासण्या मोफत.

· मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून हजारो गरजू रुग्णांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत. त्याची ऑनलाईन प्रक्रियादेखील सुरु.

· गेल्या सहा महिन्यात राज्य शासनाने 18 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा निश्चय केला आहे.

· जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू.

· शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, जलसंपदा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक.

· इंदु मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारत आहे. हे काम गतीने व्हावं यासाठी आपण स्वतः अनेकदा भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या महापुरुषांच्या स्मारकाच्या कामांना शासन गती देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला मी आवर्जून भेट दिली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

· श्री गुरु गोविंद सिंहजी आणि महाराष्ट्राचे नाते लक्षात घेता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून पाळण्याचा राज्य शासनाचा निर्णय.

· निर्भया सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईसाठी तीन वर्षांकरिता 252 कोटी रुपये मंजूर. निर्भया पथकासाठी 200 बोलेरो, 35 एर्टिगा, 200 अॅक्टिव्हा, 313 पल्सर बाईक खरेदी करण्यात येत आहेत.

· सायबर गुन्ह्यांमध्ये नोव्हेंबर 2022 अखेर 454 आरोपींना अटक. ऑनलाईन जुगार नियंत्रणासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याचा विचार.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर विश्वेश्वर नाकाडे उमेदवार जाहीर.

Sat Dec 31 , 2022
नागपूर :-महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदार क्षेत्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नागपूर क्षेत्रातील संपूर्ण 6 जिल्हे व जवळजवळ 65 तालुक्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जाळे पसरलेले आहे. त्यासाठी नागपूर क्षेत्रातील जागा आपण लढवावी असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!