नवी दिल्ली :- मोदी सरकारचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यासंदर्भात बोलताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ.महेंद्र नाथ पांडे म्हणाले की मोदी सरकारच्या सशक्त धोरणांमुळे बळकट आणि हरित भारताची उभारणी होत आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा अभूतपूर्व पद्धतीने उदय होताना दिसत आहे. स्वावलंबी भारताची उभारणी करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने याआधीच ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. स्वावलंबी भारताची उभारणी करण्याच्या दिशेने केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय अत्यंत खंबीरपणे कार्यरत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा दिसू लागले आहे असे देखील त्यांनी पुढे सांगितले.
केंद्रीय मंत्री डॉ. पांडे पुढे म्हणाले की अनेक सुट्या भागांच्या गरजेपोटी आपण इतर देशांवर अवलंबून राहत होतो त्यांचे उत्पादन आता आपल्या देशात देखील होऊ लागले आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. याशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
वाहन उद्योग क्षेत्रात लागणारे सुटे भाग आणि आधुनिक वाहन तंत्रज्ञान (एएटी) उत्पादने यांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने 25,938 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह उत्पादनाशी संलग्न मदत अनुदान योजना लागू केली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
भारताने स्वावलंबी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी देशात होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी केले पाहिजे आणि देशातील उत्पादन आणि वस्तूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवले पाहिजे याचा देखील त्यांनी ठळक उल्लेख केला. आणि याच मानसिकतेसह पुढे वाटचाल करत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्र नाथ पांडे यांनी दिली.