विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी भविष्यवेधी‍ शिक्षण  -रविंद्र ठाकरे

आदिवासी विभागाच्या 75 शाळांत सुरुवात

          नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय, भाषिक, आंतरवैयक्तिक तसेच निसर्गवादी बुद्धिमत्ता आदींमध्ये परिणामकारक बदल झाले आहे. विभागातील आदिवासी विकास विभागाच्या 75 शाळांमध्ये भविष्यवेधी शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज येथे दिली.

          शिक्षकांनी अध्यापन पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरुप वापर करुन ग्रुप लर्निंग, विषय मित्र, मोहल्ला वर्ग तसेच पिअर लर्निंगचा उपयोग करुन विभागाचा ‘नवचेतना’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही रविंद्र ठाकरे यांनी केले

          वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे भविष्यवेधी शिक्षण विचार या विषयासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते  बोलत होते. मनरेगा योजनेचे मास्टर ट्रेनर तथा शिक्षण तज्ज्ञ निलेश घुगे यावेळी उपस्थित होते.

   रविंद्र ठाकरे म्हणाले की, शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती अधिक प्रमाणात होण्यासाठी, अध्यापनाचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी शिकविण्याचे व शिकण्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पातळी व शिकण्याची गती ही वेगळी असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, अध्ययनाच्या अडचणी लक्षात घेऊन शिकविण्याच्या पध्दतीत बदल झाला पाहिजे. पारंपारिक पध्दतीपेक्षा हसतखेळत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची भिती घालवून शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास होणे आवश्यक आहे. सृजनशीलता, सहकार्य, सहानुभूती, सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी. यासाठी आश्रमशाळांच्या शिक्षकांनी अध्ययन, अनुभव, चिंतन व मननाचे नियोजन करावे. मुलांना स्वत:हून शिकण्यास प्रेरीत करावे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करुन त्याअनुषंगाने शिक्षकाने आपणास कमी लेखून त्यांच्याकडूनच सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडण्याचा प्रयत्न करावा, यामुळे ते स्वत: शिकून त्या विषयात निपूण होतील, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

          केंद्र सरकारच्या निपूण भारत अभियान अंतर्गत राज्य शासनाव्दारे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पायाभूत साक्षरतेचे विविध शैक्षणिक घटक अंतर्भूत करण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाव्दारे नवचेतना उपक्रम विभागाच्या सर्व शाळामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या नऊ प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20 हजार 361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45 हजार 129 विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शाळेच्या सर्व शिक्षकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात या प्रणालीच्या अंमलबजावणीचे यश दिसून येईल, असेही रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.

          शिक्षण तज्ज्ञ  घुले म्हणाले की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या निपूण भारत अभियान अंतर्गत देशात मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार भाषिक कौशल्य, पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये, समावेशित शिक्षण, मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचे आधारस्तंभ, गृह अध्यापन व स्वयंशिक्षण हे शैक्षणिक घटक देण्यात आले आहेत. या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य व संख्याज्ञान विकसित होईल. शिक्षकांना या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले असून त्यानुसार शिक्षकांनी मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरीत करुन त्यांना सहज, सोप्या पध्दतींचा वापर करुन विषयाच्या अध्यपनाचे काम करावे.

          घुले पुढे म्हणाले की, भविष्यवेधी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रिटीकल थिकींग, क्रिएटिव्ह थिकींग, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, कॉन्फीडन्स, कंम्पॅसन हे सहा सी विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी पुढीलप्रमाणे सहा पायऱ्यांचा उपयोग करावा. मुल स्वत: शिकण्यास प्रेरीत करणे, मुलांना शिकण्यास आव्हान देणे, विषय मित्र स्थापन करणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, एकतृतियांश वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे, मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, सेल्फी विथ सक्सेस अशा सहा पायऱ्यांचा वापर करुन मुलांच्या शिकण्याच्या गतीमध्ये वाढ होईल. यासोबतच टेक्झॉनॉमी ब्लुमजी, हावर्ड गार्डनरच्या नऊ बुध्दीमत्ता, सहा सी शिदोरी वेध आदी बाबींचा समावेश करुन समर्पक शिक्षण प्रक्रिया विकसित करावी. आदिवासी विकास विभागात भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत नवचेतना हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वत:पासून सुरुवात करुन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या नवनवीन पध्दती आत्मसात करणयासाठी प्रेरीत करावे,  असे आवाहनही  घुले यांनी यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Fri Jul 29 , 2022
रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना               मुंबई :- मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जनतेला तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर […]
eknath

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com