यवतमाळ :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19 वा हप्ता लवकरच वितरीत होणार आहे. जिल्ह्यातील ज्या पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी झाले नसेल त्यांनी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध कारणांमुळे किंवा अनावधानाने पोर्टलवर अपात्र करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 5 हजार 290 लाभार्थ्यांना पात्र करण्यात आले आहे. तसेच स्वयंनोंदणीकृत 6 हजार 741 लाभार्थ्यांना राज्यस्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय 19 व्या हप्त्याचे अनुदान खात्यात जमा होणार नाही.
सर्व पात्र झालेल्या शेतकऱ्यांनी आपले सेवा सरकार केंद्र, सेतू केंद्रातून ई-केवायसी करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार सिडींग झालेले नाही, त्यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत जावून आपले खाते आधार सिडींग करून घ्यावे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.