खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती चुकीचा इतिहास सांगत आहे, त्यासाठी बसपाने नासुप्र च्या सभापतींना दिले निवेदन

नागपूर :- नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांच्या संकल्पनेतील फुटाळा येथे संगीतमय कारंजा प्रकल्पाचा ट्रायल शो सुरू आहे. त्यात नागपूर बाबत व बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेबाबत चुकीची माहिती सांगितल्या जात आहे. त्यात सुधार व दुरुस्त्या कराव्या यासाठी आज बसपा च्या शिष्टमंडळाने नासुप्र चे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नागपूरात फुटाळा तलावावर 15 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या लाईट व म्युझिकल फाउंटेनट्रायल शो मध्ये अमिताभ बच्चन, गुलजार, नाना पाटेकर चा आवाज व ए.आर.रहमान चे संगीत असलेल्या कॉमेंट्री द्वारे पाण्याच्या कारंज्यावर नागपूरचा संपूर्ण इतिहास आहे. त्या इतिहासात नागपूर नगरी वसल्यापासून तर आजपर्यंतचा इतिहास इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषेत सांगितल्या जात आहे. फाउंटन प्रदर्शन अगदी उच्च दर्जाचे व अप्रतिम आहे परंतु यातील कॉमेंट्रीत अनेक गोष्टी त्रुटीपूर्ण व चुकीच्या आहेत. त्यात बसपा च्या शिष्टमंडळाने दुरुस्त्या सुचविल्या. हा शो सुरू होण्यापूर्वी समितीद्वारे या निवेदनावर विचार विनिमय करून त्यावर अंमल केला जाईल याचे आश्वासन या प्रसंगी नासुप्र चे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी ह्यांनी बसपा नेत्यांना दिले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 ला नागपुरात दिलेल्या धम्मदीक्षेत पाच ते सहा लाख लोकांनी दीक्षा घेतल्याचा प्रबुद्ध भारत सहित अनेक ठिकाणी संदर्भ उपलब्ध असताना 3 लाख 80 हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याचा आकडा या लाईट व म्युझिकल फाउंटेन ट्रायल शो मध्ये सांगितला. हा आकडा चुकीचा आहे. तसेच धम्मदीक्षे प्रसंगी दीक्षाभूमी वरील भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर चा इतिहास, नागा लोकांचे शहर वगैरे व नागपूरच का निवडले याबाबत संपूर्ण विस्तृत वर्णन 27 ऑक्टोबर 1956 च्या प्रबुद्ध भारताच्या आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक मध्ये उपलब्ध असताना जाणून चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप बसपा नेते उत्तम शेवडे व संदीप मेश्राम यांनी केला.

या कॉमेंट्रीत (इतिहासात) बख्त बुलंदशहा, गांधी, गोळवलकर, हेडगेवार, टिळक, भोसले आदीं अनेकांचा उल्लेख करण्यात आला. ज्यांचा नागपूरशी फारसा संबंध नाही अशा अनेक व्यक्ती व घटनांचा उल्लेखही करण्यात आला. मग काँग्रेस चे अधिवेशन असो की RSS ची स्थापना असो. परंतु राजर्षी छत्रपती शाहू राजे असताना 30, 31 मे व 1 जून 1920 रोजी अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेला बाबासाहेब आंबेडकरांसोबत नागपुरात उपस्थित असल्याचा उल्लेख मात्र हेतूत: टाळण्यात आला. 1942 ला बाबासाहेबांच्या उपस्थितीतील नागपुरातील प्रथम व सर्वात मोठी महिला परिषद, त्याच वेळी स्थापन झालेली SSD व त्यांचे संमेलन याचा ओझरता उल्लेखही नाही.

हा लाईट व म्युझिकल फाउंटेन ट्रायल शो आमच्या शासकीय पैशावर असल्याने या चुकीच्या व अपूर्ण कॉमेंट्री मध्ये विनाविलंब फेरबदल व दुरुस्त्या कराव्या अन्यथा जगापुढे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मिरविणाऱ्या द्वारे चुकीचा इतिहास जाईल. असे होऊ नये याची खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती ने तसेच शासकीय व प्रशासकीय स्तरावर दखल घ्यावी अशी अपेक्षा या प्रसंगी बसपाचे  प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण- पश्चिम चे  अध्यक्ष सदानंद जामगडे ह्यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com